![]()
चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळून 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याच्या दुर्दैवी घटनेनंतर अवघ्या एका दिवसात मुंबईत आणखी झाड कोसळण्याची घटना घडल्या आहेत. अंधेरी पूर्वमधील मरोळ मिलिटरी रोड परिसरात बुधवारी दुपारी मोठे झाड उन्मळून रस्त्यावर कोसळल्याने चार वाहनांचे मोठे नुकसान झाले, तर एका व्यक्तीला गंभीर दुखापत झाली. या सलग घटनांमुळे मुंबईतील धोकादायक झाडांच्या तपासणी आणि महापालिकेच्या उपाययोजनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. अंधेरी पूर्वचे आमदार मुरजी पटेल यांनी या घटनेची माहिती सोशल मीडियावर देत निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. चार वाहनांचे नुकसान, एक जण गंभीर जखमी गेल्या 24 तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे बामन दया पाडा, मरोळ मिलिटरी रोडवरील मोरे हॉटेलजवळ मोठे झाड उन्मळून पडले. या झाडाखाली एक धावती टोयोटा अर्बन क्रूझर तसेच रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ह्युंदाई सँट्रो, महिंद्रा XUV700 आणि मारुती वॅगन-आर या तीन वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दुर्घटनेत एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिला तातडीने मंगला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमी व्यक्ती लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना मुरजी पटेल यांनी व्यक्त केली. घटनास्थळावरील दृश्य चेंबूर दुर्घटनेनंतर पुन्हा झाड कोसळल्याने चिंता मंगळवारी चेंबूरमध्ये रस्त्यालगतचे झाड उन्मळून शाळेच्या बसवर कोसळल्याने 11 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तर इतर काही विद्यार्थी जखमी झाले होते. त्या घटनेनंतर प्रशासनाने अशा दुर्घटना टाळण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले असतानाच दुसऱ्याच दिवशी मरोळमध्ये पुन्हा झाड कोसळल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर यंत्रणा तातडीने घटनास्थळी घटनेची माहिती मिळताच आमदार मुरजी पटेल यांच्या कार्यकर्त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मुंबई अग्निशमन दल, बृहन्मुंबई महापालिकेचा वृक्ष विभाग आणि मुंबई पोलिसांनी तातडीने बचावकार्य सुरू केले. यावेळी प्रभाग समिती अध्यक्ष तथा नगरसेवक प्रकाश मुसळे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यावर देखरेख ठेवली. महापालिकेच्या वृक्ष विभागाने झाड हटवून रस्ता वाहतुकीसाठी पुन्हा खुला केला. विधानभवनातही उपस्थित केला मुद्दा घटना घडली तेव्हा आपण विधानभवनातील अधिवेशनात उपस्थित होतो, असे सांगत मुरजी पटेल यांनी हा मुद्दा तातडीने सभागृहात मांडल्याचे सांगितले. तसेच संबंधित अधिकाऱ्यांकडे त्वरित कारवाईची मागणी केल्याचेही त्यांनी नमूद केले. धोकादायक झाडांकडे दुर्लक्ष करणाऱ्यांवर कारवाईची मागणी मुंबईत अलीकडे झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत मुरजी पटेल म्हणाले की, नागरिकांनी धोकादायक झाडांबाबत तक्रारी करूनही वेळेत तपासणी, छाटणी किंवा प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नसतील, तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. “ज्या अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अशा घटना घडल्या असतील, त्यांच्यावर कायद्यानुसार कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली. नागरिकांना सावध राहण्याचे आवाहन भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावी करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मुरजी पटेल यांनी सांगितले. तसेच मुसळधार पावसाच्या काळात मोठ्या झाडांखाली वाहने उभी करू नयेत किंवा थांबू नये, तसेच धोकादायक किंवा कललेल्या झाडांची माहिती तातडीने संबंधित प्रशासनाला द्यावी, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले.
Source link
चेंबूरनंतर आता मरोळमध्येही झाड कोसळले:4 वाहनांचे नुकसान, एक जण गंभीर जखमी; निष्काळजी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी