![]()
पुण्यात एका कॅफेत तोडफोड आणि गैरवर्तन केल्याप्रकरणी पोलिस उपनिरीक्षक संदीप कदम यांना निलंबित करण्यात आले आहे. रात्रगस्तीवर असताना त्यांनी हे कृत्य केले असून, घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पुणे पोलीस प्रशासनाने ही गंभीर दखल घेतली. अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी तात्काळ निलंबनाचे आदेश दिले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून २०२६ रोजी रात्री डेक्कन पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले उपनिरीक्षक संदीप कदम यांची रात्रगस्त अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. पहाटे पावणेदोन वाजण्याच्या सुमारास ते शिरोळे रस्त्यावरील ‘फ्लाईंग जिप्सी’ या कॅफेत पोहोचले. त्यावेळी कॅफे बंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. कॅफेत शिरताच उपनिरीक्षक कदम यांनी थेट काउंटरवर जाऊन आपल्या हातातील काठीने तिथे ठेवलेले कॉफीचे ग्लास, प्लेट्स आणि इतर साहित्य खाली फेकून तोडफोड केली. तसेच कॅफेत शांतपणे बसलेल्या ग्राहकांना तिथून तात्काळ उठवून बाहेर घालवले. एवढेच नव्हे तर त्यांनी कॅफेमधील कर्मचाऱ्यांशी अत्यंत उद्दाम आणि अरेरावीची भाषा वापरत गैरवर्तन केले. हा सर्व संतापजनक प्रकार कॅफेमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने पसरला. खाकी वर्दीच्या या दादागिरीवर आणि अमानुष वर्तनावर सुजाण पुणेकर आणि व्यावसायिक वर्गातून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. या घटनेमुळे पोलिसांच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचल्याने पुणे पोलीस आयुक्तालयाने गंभीर दखल घेतली. व्हिडिओ समोर आल्यानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी अंतर्गत चौकशी केली. प्राथमिक तपासात उपनिरीक्षक कदम यांचे कृत्य पूर्णपणे बेजबाबदार आणि पोलीस खात्याच्या शिस्तीला तडा देणारे असल्याचे सिद्ध झाले. या गैरवर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा जनमानसात मलीन झाल्याचा ठपका ठेवत अप्पर पोलीस आयुक्त राजेश बनसोडे यांनी संदीप कदम यांच्या निलंबनाचे आदेश दिले. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि पब यांच्यासाठी दीड वाजेपर्यंतची वेळ मर्यादा आखून दिली आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करताना पोलिसांनी थेट आस्थापनेत न शिरता, मॅनेजरला बाहेर बोलावून कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. उपनिरीक्षक कदम यांनी या नियमांचे सरळ उल्लंघन करून थेट तोडफोड केल्याने पोलीस वर्तुळातही या कारवाईची जोरदार चर्चा रंगली आहे.
Source link
दादागिरी भोवली:पुण्यात कॅफेत तोडफोड करणारा पोलिस उपनिरीक्षक निलंबित; सीसीटीव्ही व्हायरल झाल्यावर कारवाई