Headlines

वसंतराव नाईक जयंतीनिमित्त 'कृषी दिन' साजरा:महायुती सरकारला विसर पडल्याची काँग्रेसची टीका




महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने महायुती सरकारवर ‘महाराष्ट्र कृषी दिना’चा विसर पडल्याची टीका केली आहे. दिवंगत वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त राज्यभर ‘कृषी दिन’ साजरा केला जातो. पुणे येथील काँग्रेस भवन येथे आयोजित अभिवादन कार्यक्रमात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे ज्येष्ठ प्रवक्ते गोपाळ तिवारी यांनी ही टीका केली. तिवारी यांनी सांगितले की, वसंतराव नाईक हे संयुक्त महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले एक दूरदृष्टीचे नेते होते. यवतमाळ जिल्ह्यातील गहुली खेड्यातील बंजारा समाजातून आलेल्या या कर्तबगार ओबीसी नेतृत्वाला काँग्रेस पक्षाने संधी देऊन राजकारणात सामाजिक समानतेचा पाया रचला. नाईक यांनी आपल्या कार्यकाळात महाराष्ट्रात ‘हरितक्रांती’ आणि ‘पंचायत राज’ची यशस्वी मुहूर्तमेढ रोवली. १९७२ च्या भीषण दुष्काळात त्यांनी शेती उत्पादनाला आणि सिंचन प्रकल्पांना प्राधान्य दिले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे महाराष्ट्र अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाला. त्यांनी ग्रामीण भागातील शेतकरी व मजुरांना दुष्काळात काम मिळवून देण्यासाठी ‘रोजगार हमी योजने’चा पाया रचला. तसेच, दुग्धोत्पादनाला चालना देऊन श्वेतक्रांती घडवली आणि एमआयडीसीच्या माध्यमातून राज्यात औद्योगिकीकरणाला गती देत रोजगाराच्या नवीन संधी निर्माण केल्या. या प्रसंगी पुणे शहर जिल्हा काँग्रेसतर्फे वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यातील समस्त शेतकरी बांधवांना ‘कृषी दिना’च्या शुभेच्छा देण्यात आल्या. या कार्यक्रमाला पुणे शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष प्रशांत जगताप, दीप्ति चवधरी, राजाभाऊ कदम, गुलामहुसेन खान, सौ. ऋग्वेदिता सपकाळ, भगवान कडू, दीपक ओव्हाळ, शबीर शेख, धनंजय पाटील, हरिदास आडसूळ, देविदास लोणकर, दादासाहेब कामठे, राजेंद्र पडवळ, रोहित साळवे, आबा तरवडे, धनंजय दाभाडे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *