![]()
एका चुकीच्या निर्णयाने आणि माणुसकीपोटी घेतलेल्या जामीनदारीने एका शेतकऱ्याचे आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाचे आयुष्य कसे उद्ध्वस्त होऊ शकते, याचे विदारक वास्तव लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील ‘नणंद’ गावातून समोर आले आहे. गेल्या चार वर्षांपासून गावातील भोसले कुटुंब खासगी सावकाराच्या अशा चक्रव्यूहात अडकले आहे की, त्यांना त्यांची पाच एकर शेती गमवावी लागली आणि तरीही सावकाराचा ‘कर्जाचा तगादा’ संपलेला नाही. या प्रकारामुळे केवळ भोसले कुटुंबच नव्हे, तर गावातील २० ते २२ हून अधिक कुटुंबे गाव सोडून पळून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नणंद येथील पुंडलिक भोसले यांनी आपल्या एका मित्राला खासगी सावकाराकडून दीड लाख रुपयांचे कर्ज मिळवून देण्यासाठी जामीनदार म्हणून स्वाक्षरी केली होती. मात्र, संबंधित मित्राला हे कर्ज वेळेवर फेडता आले नाही. त्यामुळे सावकाराने आपला मोर्चा जामीनदार असलेल्या भोसले यांच्याकडे वळवला. व्याजावर व्याज लावून कर्जाचा डोंगर इतका वाढवला गेला की, भोसले यांना नाईलाजाने आपली ५ एकर बागायती जमीन (किंमत अंदाजे सव्वा कोटी रुपये) सावकाराच्या नावावर करून द्यावी लागली. नातेवाईकांवरही अन्याय, मारहाण आणि डांबून ठेवले पुंडलिक भोसले यांना वाचवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांनी जामीनदारी स्वीकारली, मात्र त्यांचीही अवस्था भोसले कुटुंबासारखीच झाली. ३० ते ४० लाख रुपये देऊनही आणि साडेतीन एकर जमीन सावकाराच्या नावावर करून देऊनही सावकाराचे समाधान झाले नाही. याउलट, संबंधित नातेवाईकांना मारहाण करण्यात आली आणि तब्बल तीन दिवस बेकायदेशीरपणे डांबून ठेवल्याचा धक्कादायक आरोप पीडितांनी केला आहे. पोलिस कारवाईवर प्रश्नचिन्ह निलंगा पोलिस ठाण्यात या सावकाराविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, पोलिसांनी तक्रार नोंदवून घेतल्यानंतरही अद्याप एकाही आरोपीला अटक झालेली नाही. “कागदोपत्री व्यवहार कायदेशीर आहेत,” असे कारण पुढे करून प्रभावी कारवाई टाळली जात असल्याचा गंभीर आरोप पीडित शेतकऱ्यांनी केला आहे. केवळ भोसले कुटुंबच नाही, तर नणंद गावातील जवळपास २० ते २२ कुटुंबांनी सावकाराच्या या जाचाला कंटाळून आपली घरे-दारं सोडून गाव सोडले आहे. या परिसरातील भयावह वास्तव पाहता, प्रशासनाने तातडीने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे, अन्यथा सावकारीच्या या पाशात आणखी अनेक कुटुंबे होरपळून निघतील. सावकाराचा ‘चक्रव्यूह’: कसा फसतो शेतकरी? खासगी सावकाराने या भागात कर्जाचे असे जाळे विणले आहे की, एकदा त्यात अडकलेला शेतकरी बाहेर पडणे अशक्य होते. सावकाराच्या चक्रव्युहात शेतकरी कसा फसतो ते जाणून घेऊयात. सुरुवात: गरजूंना सुरुवातीला ३ महिन्यांसाठी ५ टक्के मासिक व्याजाने १ लाख रुपयांचे कर्ज दिले जाते व दोन जामीनदार घेतले जातात. दंडाची सक्ती: ठरलेल्या मुदतीत मुद्दल आणि व्याज न दिल्यास, दररोज हजारो रुपयांचा दंड लावला जातो. तसेच जामीनदारांना शिवीगाळ व मारहाण सुरू होते. दुसऱ्या सावकाराची एन्ट्री: पहिल्या सावकाराचे कर्ज फेडता न आल्यास, तोच सावकार जाणीवपूर्वक दुसऱ्या सावकाराकडून (१० टक्के व्याजाने) पैसे घेऊन आपले कर्ज वसूल करतो. शेतकरी मात्र या नव्या कर्जाच्या खाईत अधिक खोलवर अडकतो. जमिनींवर डल्ला: अखेर दहशत आणि दबावाचा वापर करून शेतकऱ्यांच्या जमिनी कायदेशीररित्या (रजिस्टर करून) हडपल्या जातात. कागदोपत्री सर्व व्यवहार कायदेशीर दिसत असल्याने न्याय मिळणे कठीण होऊन बसते. हे ही वाचा…. एक लाखाचे कर्ज 74 लाखांवर:सावकाराने पैशांसाठी शेतकऱ्याला किडनी विकायला लावली, चंद्रपुरातील धक्कादायक प्रकार एकीकडे देश ‘विश्वगुरू’ बनण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याच्या आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या घोषणा सरकारकडून केल्या जात आहेत. मात्र, दुसरीकडे सावकाराने एका शेतकऱ्याला कर्ज फेडण्यासाठी चक्क स्वतःची किडनी विकावी लागल्याची मन सुन्न करणारी घटना चंद्रपुरातून समोर आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील एका तरुण शेतकऱ्याने सावकाराच्या जाचाला कंटाळून थेट कंबोडिया गाठत आपली किडनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सविस्तर वाचा…
Source link
लातूरमध्ये सावकारी पाश:मित्राच्या दीड लाखांच्या कर्जापायी गमावली सव्वा कोटींची शेती, निलंग्यात अनेकांवर गाव सोडण्याची वेळ