Headlines

नांदूर शिंगोटे महामार्ग, शिवरायांच्या पुतळ्याच्या कामाची पाहणी:कामामध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना माजी खासदार डॉ.सुजय विखे यांची तंबी‎




राहाता हवामानात झालेला बदल आणि कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी सोमवारी सकाळी लोणी खुर्द व लोणी परिसरात सुरू असलेल्या विकासकामांचा धडाकेबाज दौरा केला. प्रत्यक्ष घटनास्थळी जात त्यांनी सुरू असलेल्या कामांची पाहणी केली आणि नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. विशेष म्हणजे, भर पावसात लोणी येथील एका पंक्चरच्या दुकानातच डॉ. विखे यांनी ‘जनता दरबार’ भरवून नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले. दौऱ्यादरम्यान डॉ. सुजय विखे पाटील यांनी कोल्हार–नांदूर शिंगोटे महामार्गाच्या कामाची ग्रामस्थांसमवेत प्रत्यक्ष पाहणी केली. महामार्गाच्या कामात दर्जा राखला जावा आणि पावसाळ्यात नागरिकांना वाहतुकीची कोणतीही अडचण येऊ नये, याचा त्यांनी आढावा घेतला. लोणी खुर्द येथे सुरू असलेल्या महामार्गाच्या व गटर बांधकामाचीही त्यांनी पाहणी केली. नागरिकांनी मांडलेल्या समस्यांची दखल घेत, कामात कोणताही हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे निर्देश त्यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. लोणी परिसरात अचानक पाऊस सुरू झाल्यानंतरही डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपला दौरा थांबवला नाही. त्यांनी तेथील एका पंक्चरच्या दुकानातच नागरिकांच्या समस्या ऐकण्यास सुरुवात केली. मतदारसंघासह जिल्ह्याच्या विविध भागांतून आलेल्या नागरिकांनी निवेदनांच्या माध्यमातून आपल्या अडचणी मांडल्या. डॉ. विखे यांनी प्रत्येकाचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवरून संपर्क साधला आणि प्रश्न तातडीने सोडवण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी कोल्हार येथे उभारण्यात येत असलेल्या भव्य अश्वारूढ छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या कामाची ग्रामस्थांच्या उपस्थितीत पाहणी केली. कामाची पाहणी करत असताना काही त्रुटी त्यांच्या निदर्शनास आल्या. यावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संबंधित अधिकारी व ठेकेदारांना गुणवत्तापूर्ण आणि दिलेल्या मुदतीतच काम पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश दिले. कोल्हार-नांदूर शिंगोटे महामार्गाची पाहणी करताना माजी खासदार डॉ. सुजय विखे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *