Headlines

पंढरपूर आषाढी यात्रेसाठी एसटीच्या 225 विशेष बस:भाविकांसाठी विशेष वाहतूक व्यवस्था; 45 प्रवाशांचा गट असेल तर गावातूनच बसची सोय‎


.

आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अकोला विभागाने यंदा २२५ विशेष एसटी बस चालवण्याचा निर्णय घेतला आहे. या विशेष बस २० ते ३० जुलै या कालावधीत उपलब्ध राहणार आहेत. यात्रेचा मुख्य दिवस २५ जुलै आहे. भाविकांना सुरक्षित, सोयीस्कर, वेळेवर प्रवास करता यावा यासाठी ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

आषाढी एकादशी ही वारकरी संप्रदायातील सर्वात मोठी धार्मिक यात्रा मानली जाते. लाखो वारकरी संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्यांसह पंढरपूरमध्ये विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी एकत्र येतात. जिल्ह्यातून पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. काही जण पायी जातात. काहींना पायी जाणे शक्य नसल्याने ते वाहनाने जातात. एसटी, रेल्वेने जाणारे आगाऊ आरक्षणही करून ठेवतात. दरवर्षी एसटीकडून विशेष गाड्या केवळ पंढरपूरसाठी सोडण्यात येतात. यंदाही आषाढी एकादशी यात्रेसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांची वाढती गर्दी लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून विशेष एसटी बस चालवण्यात येणार आहेत.

परतीच्या प्रवासासाठीही आरक्षणाची सुविधा पंढरपूर यात्रेला जाण्यासाठी विशेष म्हणजे, ४५ प्रवाशांचा स्वतंत्र गट तयार झाल्यास संबंधित आगाराशी संपर्क करून गावातूनच थेट एसटी बसची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. ग्रामीण भागातील वारकऱ्यांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरणार आहे. परतीच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षणाची सुविधाही सर्व आगारांमध्ये उपलब्ध करण्यात आली आहे.

बसच्या वेळापत्रकासाठी जवळच्या एसटी आगाराशी संपर्क साधावा लागणार आहे. गर्दी टाळण्यासाठी नियोजित वेळेपूर्वी बसस्थानकावर पोहोचावे लागणार आहे. यात्रेच्या दिवसांत प्रवाशांची संख्या वाढल्यास गरजेनुसार आणखी विशेष बस सोडण्याची तयारी एसटी प्रशासनाने दर्शवली आहे. भाविकांनी जवळच्या आगाराशी संपर्क साधून आगाऊ नियोजन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *