![]()
काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी अयोध्येतील राम मंदिर देणगी घोटाळ्याची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांमार्फत सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. त्यांनी केंद्र सरकारने या प्रकरणाची सविस्तर आणि पारदर्शक माहिती द्यावी, अशी मागणीही केली. पाटकर यांनी राम मंदिर ट्रस्टचे माजी विश्वस्त चंपतराय यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घोटाळ्याबाबत आणि मंदिर ट्रस्टच्या स्थापनेबाबत देशातील कोट्यवधी भाविकांना उत्तर द्यावे, असेही ते म्हणाले. ते ‘प्रभू श्रीराम मंदिराच्या दानपेटीवर भाजपचा दरोडा’ या विषयावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी काँग्रेसचे माजी आमदार मोहन जोशी, शहराध्यक्ष दीप्ती चौधरी, प्रशांत जगताप, सौरभ अमराळे आणि अर्चना शाह उपस्थित होते. पाटकर यांनी सध्या अस्तित्वात असलेला राम मंदिर ट्रस्ट रद्द करून सर्वसमावेशक सदस्य असलेले नवीन ट्रस्ट स्थापन करण्याची सूचना केली. ट्रस्टने आतापर्यंत केलेल्या खर्चाचे ऑडिट झाले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली. भगवान राम हे कोणत्या एका पक्षाचे नसून ते संपूर्ण देशवासीयांचे आहेत, असे पाटकर म्हणाले. या मंदिरात गैरव्यवहार करणाऱ्यांची नावे समोर यायला हवीत. भाजपचे मंत्री किंवा मुख्यमंत्री यावर का बोलत नाहीत, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. देशात भाजपने लोकशाही शिल्लक ठेवली नाही, असा आरोप पाटकर यांनी केला. विविध राज्यांतील सरकारे पाडून विरोधकांना स्वतःच्या पक्षात घेण्याचे धोरण भाजप अवलंबत आहे. दुसऱ्या पक्षातील लोकप्रतिनिधींवर आरोप करून त्यांना पक्षात घेतल्यावर पवित्र केल्याचा देखावा भाजप करत असून, कोट्यवधी रुपये खर्च करून लोकप्रतिनिधी विकत घेतले जात आहेत, असेही ते म्हणाले.
Source link
राम मंदिर देणगी घोटाळा प्रकरण:सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांकडून चौकशी करा, चंपतराय यांच्यावर गुन्हा दाखल करा, काँग्रेसचे अमित पाटकर यांची मागणी