![]()
हिंगोली तालुक्यातील सवड शिवारात शेताच्या धुऱ्यावर झटका मशीन लावण्याच्या कारणावरून जिवे मारण्याची धमकी व हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी परस्पर तक्रारीवरून 14 जणांवर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात सोमवारी ता. 13 गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सवड शिवारात गौतम जावळे व ईश्वर जावळे यांचे शेत आहे. या भागात वन्य प्राणी मोठ्या प्रमाणावर असून कळपाने राहणारे प्राणी शेतात पिकांची नासाडी करीत आहेत. सध्या शेतात सोयाबीन व इतर कोवळी पिके असून या पिकांचे वन्य प्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे गौतम जावळे यांनी धुऱ्यावर झटका मशीन लावली होती त्या मशीनचा तार सर्व शेताच्या बाजूने लावला जात होता. यावेळी तार लावण्याच्या कारणावरून गौतम व ईश्वर यांच्यात वाद सुरु झाला. झटका मशीनचा तार आमच्या धुऱ्याकडून का लावतो या कारणावरून शाब्दीक चकमकीने सुरु झालेला वाद जिवे मारण्याच्या धमक्या पर्यंत पोहोचला. दोन्ही कडील मंडळी हातात काठ्या, कत्ती घेऊन उभे होते. यामध्ये जिवे मारण्याच्या धमक्याही देण्यात आल्या. याप्रकरणी गौतम जावळे यांच्या तक्रारीवरून ईश्वर जावळे, निखील जावळे, दामोदर जावळे, सिध्दार्थ जावळे, सचिन जावळे, नामदेव जावळे यांच्यासह अन्य तिघांवर नर्सी नामदेव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणात ईश्वर जावळे यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गौतम जावळे, दिनेश जावळे, सुधाकर जावळे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक घारगे, जमादार एस. एन. खांडेकर, खंडेराव नरोटे, एम. वाय. काळे पुढील तपास करीत आहोत.
Source link
हिंगोलीत झटका मशीन लावण्यावरून राडा:दोन गट आपापसात भिडले, जिवे मारण्याची धमकी, 14 जणांवर गुन्हे दाखल