Headlines

पुण्यात घायवळ गँग पुन्हा सक्रिय?:सिमकार्ड गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदेवर कोयत्याने वार, थरार सीसीटीव्हीत कैद




पुण्यातील कोथरूड परिसरात मंगळवारी सायंकाळी एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या विरोधातील एका गुन्ह्यातील फिर्यादी अमित शिंदे या तरुणावर 8 ते 10 जणांच्या टोळक्याने भररस्त्यात कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात अमित गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले असून, या हल्ल्यामुळे पुण्यात नीलेश घायवळची टोळी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे का, असा गंभीर प्रश्न उपस्थित होत आहे. जखमी अमित शिंदे यांचे कोथरूडमध्ये मोबाईलचे दुकान आहे. काही काळापूर्वी नीलेश घायवळ याने अमित यांच्या दुकानातून बनावट कागदपत्रांच्या आधारे एक सिमकार्ड घेतले होते आणि त्याचा वापर अनेक गुन्ह्यांमध्ये केला होता. पोलिस तपासात ही बाब समोर आल्यानंतर अमित शिंदे यांच्या फिर्यादीवरून कोथरूड पोलिस ठाण्यात घायवळविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नीलेश घायवळवर ‘मकोका’ (MCOCA) कायद्यांतर्गत कारवाई करण्याच्या प्रक्रियेत हा गुन्हा अत्यंत महत्त्वाचा ठरला होता. याच गुन्ह्याचा राग मनात धरून हा हल्ला करण्यात आल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. थरार सीसीटीव्हीत कैद मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास अमित शिंदे आपल्या दुकानाबाहेर उभे असताना अचानक आलेल्या 8 ते 10 जणांच्या टोळक्याने त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार करण्यास सुरुवात केली. अमित यांच्या डोक्यावर कोयत्याचे दोन गंभीर वार बसल्याने ते रक्ताच्या थारोळ्यात कोसळले. हा संपूर्ण थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. घटनेची माहिती मिळताच कोथरूड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. मात्र, अद्याप एकाही हल्लेखोराला अटक झालेली नाही. कुख्यात नीलेश घायवळ हा गेल्या सप्टेंबर महिन्यात परदेशात पळून गेला असून त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच त्याच्याविरुद्ध तक्रार करणाऱ्यावर पुण्यात थेट हल्ला झाल्याने, घायवळ परदेशातूनच आपली टोळी चालवत असल्याचा संशय बळावला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *