![]()
इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी आणि उच्च शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाने (MOBCFDC) विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले आहेत. या योजनांतर्गत अत्यंत अल्प व्याजदराने किंवा बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून दिले जात आहे. पात्र इच्छुकांनी या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा व्यवस्थापक व्ही. एस. खोडे यांनी केले आहे. महामंडळातर्फे राष्ट्रीयीकृत बँकांमार्फत ‘२० टक्के बीज भांडवल योजना’ राबविली जाते. या योजनेत कमाल ५ लाख रुपयांपर्यंतच्या प्रकल्पांना मंजुरी दिली जाते, ज्यामध्ये महामंडळाचा हिस्सा २० टक्के असतो. या योजनेसाठी अर्जदाराचे वय १८ ते ५० वर्षांदरम्यान असणे आवश्यक आहे. याशिवाय, महामंडळामार्फत थेट ‘थेट कर्ज योजना’ देखील उपलब्ध आहे. या योजनेत छोट्या व्यवसायांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाते. कर्जाची नियमित परतफेड ५ वर्षांत केल्यास कोणतेही व्याज आकारले जात नाही. या योजनेसाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपर्यंत असणे बंधनकारक आहे. व्यावसायिक वृद्धीसाठी बँकांमार्फत ‘वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना’ उपलब्ध आहे. या योजनेत १ ते १० लाख रुपयांपर्यंत कर्ज दिले जाते. कर्जाची नियमित परतफेड केल्यास महामंडळातर्फे १२ टक्केपर्यंत व्याज परतावा थेट लाभार्थ्याला अनुदान स्वरूपात दिला जातो. यासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न ८ लाख रुपयांपर्यंत असावे लागते. इतर मागासवर्गीय महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी ‘महिला स्वयंसिद्धी व्याज परतावा योजना’ माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राच्या मदतीने राबविली जात आहे. यात बचत गटांच्या उद्योगांसाठी ५ ते १० लाख रुपयांपर्यंतच्या कर्जावर १२ टक्के व्याज परतावा दिला जातो. उच्च शिक्षणासाठी देखील महामंडळातर्फे कर्ज योजना उपलब्ध आहे. देशांतर्गत व परदेशातील अभ्यासक्रमांसाठी १० ते २० लाख रुपयांपर्यंत शैक्षणिक कर्ज दिले जाते. यावर नियमित परतफेडीवर १२ टक्के व्याज परतावा मिळतो. यासाठी विद्यार्थी १२ वी मध्ये ८० टक्केपेक्षा जास्त गुणांनी उत्तीर्ण झालेला असावा आणि त्याचे वय १७ ते ३० वर्षांदरम्यान असावे. या सर्व योजनांच्या अधिक माहितीसाठी आणि लाभासाठी पात्र नागरिकांनी महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाचे विभागीय कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, पोलीस आयुक्तालय, अमरावती (फोन क्र. ०७२१-२६६१२६१) येथे संपर्क साधावा. तसेच, महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.msobcfdc.in भेट देऊन माहिती मिळवता येईल.
Source link
ओबीसींसाठी स्वयंरोजगाराची संधी:विविध कर्ज योजनांसाठी प्रस्ताव मागवले