Headlines

उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात नीलगायीची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश:एका आरोपीला अटक, 3 वाहने व मांस जप्त




नागपूर वनविभागांतर्गत येणाऱ्या उत्तर उमरेड वनपरिक्षेत्रात नीलगायीची शिकार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. पोलीस आणि वनविभागाच्या संयुक्त पथकाने मौजा उटी येथे १५ जुलै २०२६ रोजी पहाटे ३ वाजता ही कारवाई केली. यात एका आरोपीला रंगेहाथ अटक करण्यात आली असून, तीन वाहने आणि शिकार केलेले मांस जप्त करण्यात आले आहे. पहाटेच्या गस्तीदरम्यान उटी बीटमधील मौजा उटी (सर्वे क्रमांक १५०) येथील एका खाजगी शेतात संशयास्पद हालचाली आढळून आल्या. वनकर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तात्काळ धाड टाकून शिकार करणाऱ्या टोळीला घेरले. या कारवाईत अभिषेक उर्फ अभिशेखर पुनाराम अडोळे (वय ३८, रा. हेवती, ता. उमरेड, जि. नागपूर) याला रंगेहाथ पकडण्यात आले. इतर फरार आरोपींचा शोध पोलीस आणि वनविभागाचे पथक घेत आहे. घटनास्थळाच्या तपासणीत, शिकारी टोळीने अंदाजे ४ वर्षे वयाच्या आणि ८० किलो वजनाच्या एका नर नीलगायीची भरमार बंदुकीने गोळी घालून शिकार केल्याचे समोर आले. शिकारी टोळी नीलगायीचे शरीर, कातडे, पाय आणि मांस कापून पळवून नेण्याच्या तयारीत असतानाच त्यांना पकडण्यात आले. वनविभागाने शिकार केलेले मांस, तसेच गुन्ह्यात वापरलेली स्कूटी, मोटरसायकल आणि विना नंबरची मोटरसायकल जप्त केली आहे. या प्रकरणी वनगुन्हा नोंदवण्यात आला असून, वन्यजीव (संरक्षण) अधिनियम, १९७२ च्या कलम २ (१६), ९, ३९, ४४ आणि ५१ च्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *