छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (CSMRDA) अंतर्गत कंत्राटी पदभरतीला विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी मंजुरी दिली आहे. प्राधिकरण क्षेत्राचा नियोजनबद्ध आणि सर्वांगीण विकास अधिक गतिमान करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या उद
.
हा महत्त्वपूर्ण निर्णय सीएसएमआरडीए कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत घेण्यात आला. या बैठकीला सहआयुक्त अंजली धानोरकर, महानगर नियोजनकार हर्षल बाविस्कर, महानगर उपआयुक्त (प्रशासन) लखीचंद चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना आयुक्त जी. श्रीकांत यांनी प्राधिकरण क्षेत्रातील वाढती लोकसंख्या, वेगाने होणारे औद्योगिकीकरण आणि विविध पायाभूत विकास प्रकल्पांमुळे सक्षम मनुष्यबळाची गरज अधोरेखित केली. नागरिकांना दर्जेदार नागरी सुविधा वेळेत पुरवण्यासाठी आणि विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी रिक्त पदे भरण्यासोबतच अतिरिक्त मनुष्यबळ कंत्राटी पद्धतीने नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही भरती प्रक्रिया छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या धर्तीवर राबवण्यात येणार आहे. या प्रक्रियेद्वारे विविध तांत्रिक, प्रशासकीय आणि सहाय्यक पदांसाठी पात्र उमेदवारांची नियुक्ती केली जाईल.
बैठकीत सीएसएमआरडीएमधील नियमित पदभरतीचाही आढावा घेण्यात आला. प्राधिकरणातील वर्ग-एक ते वर्ग-ड अशा एकूण १४७ पदांसाठी सेवा प्रवेश नियमावली तयार करण्यात आली आहे. शासनाच्या नियमानुसार नियमित भरती प्रक्रिया राबवण्याबाबत सहआयुक्त अंजली धानोरकर यांनी सविस्तर सादरीकरण केले.
या बैठकीत प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार (पीएमसी) नियुक्ती प्रक्रिया, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या निवडीचे निकष, बाह्यस्त्रोताद्वारे पात्र मनुष्यबळ उपलब्ध करून घेण्याची कार्यपद्धती यावरही चर्चा झाली. तसेच, आवश्यक शैक्षणिक पात्रता, अटी व शर्ती आणि संबंधित एजन्सीच्या निवडीबाबतही सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.
सीएसएमआरडीएमध्ये आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध झाल्यानंतर प्राधिकरण क्षेत्रातील विकासकामांना अधिक गती मिळेल, असा विश्वास बैठकीत व्यक्त करण्यात आला. यामुळे नागरिकांना आधुनिक, दर्जेदार आणि नियोजनबद्ध नागरी सुविधा प्रभावीपणे उपलब्ध करून देणे शक्य होईल, असेही नमूद करण्यात आले.
