![]()
काँग्रेसमध्ये शहर आणि जिल्हाध्यक्षांच्या निवडीसाठी ‘सृजन अभियान’ सुरू झाले आहे. याअंतर्गत राज्यभरात जिल्हा आणि शहर अध्यक्षांच्या बदलाच्या प्रक्रियेला गती मिळाली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या आठवडाभरापासून काँग्रेसचे निरीक्षक स्थानिक पातळीवर चाचपणी करत आहेत. यामध्ये काँग्रेस नेते अतुल लोंढे, मुजाहीद खान, बाळासाहेब थोरात आणि ‘सृजन अभियाना’चे प्रभारी विवेक बन्सल यांचा समावेश आहे. या निवडीसाठी स्थानिक पातळीवर सर्व्हे केला जात आहे. संबंधित पदाधिकारी आणि स्वयंसेवी संस्थांच्या प्रतिनिधींसोबत बैठका घेऊन नवीन निर्णय घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ब्लॉक अध्यक्ष पातळीवरही कार्यकर्त्यांशी चर्चा केली जात आहे. ज्यांना गोपनीय चर्चा करायची होती, त्यांच्यासोबत ‘बंद खोली’त ‘वन-टू-वन’ संवाद साधण्यात आला. काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सोशल इंजिनीअरिंग’ आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहावर ब्लॉक अध्यक्षांच्या निवडी केल्या जातील. ज्यांनी पाच वर्षे अध्यक्षपद सांभाळले आहे, त्यांना पुन्हा संधी दिली जाणार नाही. यामुळे राज्यात अनेक जिल्हाध्यक्षांची पदे बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. काँग्रेसमध्ये संघटनात्मक बदल सहसा लवकर होत नाहीत, अशी कायम चर्चा असते. मात्र, या अभियानामुळे तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून चर्चा केली जात असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. तरीही, केवळ चर्चा आणि बैठकांचे सत्र सुरू राहणार की प्रत्यक्ष काही बदल होणार, याबाबत गटतटांमध्ये चर्चा सुरू आहे. अध्यक्ष निवडीत मागील निवडणुकांच्या निकालाचा आधार घेतला जाईल की नाही, यावरही अंतर्गत विचारमंथन सुरू आहे. एकेकाळी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात काँग्रेसची मोठी संघटनात्मक ताकद होती. परंतु, गेल्या दहा वर्षांत ती लक्षणीयरीत्या कमी झाली आहे. महापालिकेत काँग्रेसचा केवळ एक नगरसेवक, तर जिल्हा परिषदेतही एकच सदस्य निवडून आला होता. छत्रपती संभाजीनगरमधील मतदारसंघांचा वापर अनेकदा ‘सीट शेअरिंग’साठी केला जातो. आघाडीत येथील काँग्रेसचे पारंपरिक मतदारसंघ मित्रपक्षांना सोडले जातात. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पूर्व मतदारसंघ समाजवादी पक्षाला देण्यात आला होता, तर २०२४ मध्ये उमेदवार बदलण्यात आला. मुजाहीद खान यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना सांगितले की, जिल्ह्यात लोकांचा काँग्रेसला मोठा पाठिंबा मिळत आहे. काँग्रेसमध्ये ‘सोशल इंजिनीअरिंग’ करण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.
Source link
काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी 'सृजन अभियान' सुरू:5 वर्षे अध्यक्ष राहिलेल्यांना संधी नाही; केवळ चर्चा की बदल, उत्सुकता