![]()
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पायाभूत सुविधांना गती देणाऱ्या शेंद्रा-बिडकीन ते ढोरेगाव या सुमारे ६७.८० किलोमीटरच्या नव्या ग्रीनफील्ड रस्ते प्रकल्पाचे राजपत्र प्रसिद्ध झाले. सार्वजनिक बांधकाम विभागाने या मार्गाला ‘राज्य महामार्ग क्रमांक ६१३’ म्हणून अधिसूचित केले. येत्या १० दिवसांत या प्रकल्पाची निविदा प्रसिद्ध होईल. या रस्त्याचे काम १०० टक्के पूर्ण झाल्यावर छत्रपती संभाजीनगरसह मराठवाडा, खान्देशातील प्रवाशांची ढोरेगावमार्गे पुण्याला जाताना दीड तासांची बचत होईल. हा मार्ग थेट डीएमआयसी नोड आणि पुढे पुणे – अहिल्यानगर मार्गाशी जोडला जाणार आहे. त्यामुळे या भागातील मालवाहतूक, दळणवळण जलद गतीने होईल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला मोठी चालना मिळेल. प्रकल्पाचे दोन प्रमुख भाग : भाग-१ : छत्रपती संभाजीनगर डीएमआईसी नोड क्रमांक-१ करमाड ते बीडकीन (लांबी : ३२ किलोमीटर). भाग-२ : बिडकीन ते ढोरेगाव (पुणे-अहिल्यानगर मार्ग, लांबी : ३५.८० किलोमीटर) उद्योगासाठी महत्त्वाचा रस्ता : छत्रपती संभाजीनगरमधील औद्योगिक वसाहतीमधून पुणे रस्त्यावर जाण्यासाठी लागणारा अडीच तासांचा वेळ १ तासांवर येणार आहे. म्हणजे औद्योगिक उत्पादनांच्या वाहतुकीचा सुमारे दीड तास वाचेल. संभाजीनगर परिसरातील ३ औद्योगिक वसाहती परस्पर आणि पुण्याशी जोडल्या जातील. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या उद्योगांसाठी हा रस्ता महत्त्वाचा ठरेल. रस्त्यासाठी ३ तालुक्यांत होणारे भूसंपादन : छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील (६३ हेक्टर ७२ आर क्षेत्रफळ)करमाड, हिवरा, लाडगाव, टोनगाव, जडगाव, गारखेडा, आपतगाव, भालगाव, सटाणा, मंगरुळ या गावांचा समावेश आहे. पैठण तालुक्यातील (१५६ हेक्टर १८ आर क्षेत्रफळ) पाचोड, एकोड, चिंचोली, तोला नाईक तांडा, गाडीवाट, घारदोन, निलजगाव, पाडळी, गाझीपूर, लाखेगाव, मेहेरबान नाईक तांडा, अलीपूर, नांदलगाव, ताहेरपूर, कवडगाव, जैनपूर, तोंडोली, गाढेगाव, अलीयाबाद, शेकटा, तुळापूर वाडी, औरंगपूर वाडी, बिडकीन, सोेमपुरी या गावांचा समावेश आहे. तसेच, गंगापूर तालुक्यातील (७६ हेक्टर ७३ आर क्षेत्रफळ) शिवपूर, पांढर ओहळ, तळपिंप्री, हरसुली, मांगेगाव, झांझर्डी, हमजाबाद, नंद्राबाद, सोलेगाव, हनुमंतगाव, भेंडाळा, खैरगव्हाण या गावांचा समावेश आहे. मोजणी, भूसंपादन तीन महिन्यांतच पूर्ण होणार रस्त्यासाठी राजपत्र प्रसिद्ध झाले आहे. आता भूमिअभिलेख विभागाकडून मोजणीनंतर भूसंपादन प्रक्रिया ३ महिन्यांत पूर्ण होईल. १० दिवसांत निविदा प्रक्रिया होणार आहे. – एस. एस. भगत, अधीक्षक अभियंता, सा. बां. विभाग.
Source link
संभाजीनगरमधील शेंद्रा-बिडकीन-ढोरेगाव ग्रीनफील्ड रस्त्यासाठी १० दिवसांत निविदा:महामार्ग थेट एमआयडीसीला जोडला जाणार असल्याने प्रवासाचा दीड तास वाचणार