![]()
मंगेश फल्ले | पुणे सियाच्या हट्टानंतर केतनने लोहगडावर जाण्यास दिली परवानगी केतनचे वडील विशाल अग्रवाल यांची ‘दिव्य मराठी’शी बोलताना माहिती, तिच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:ख आम्हाला दिसले नाही
लाेहगड किल्ल्यावरून १८ जून राेजी ४०० फूट खोल दरीत ढकलून देत व्यावसायिक केतन अग्रवाल याचा खून त्याची नियोजित पत्नी सिया गोयल (२०) व तिचा प्रियकर चेतन चौधरी (२२) यांनी केला होता. या प्रकरणास एक महिना पूर्ण होत असताना सिया गोयलचे विविध कारनामे समोर आल्याने अग्रवाल कुटुंबाला धक्का बसला आहे. सिया हिचा वाढदिवस १९ जून रोजी होता. त्यापूर्वी १८ जून रोजी लाेहगड किल्ल्यावर माझ्या दोन मैत्रिणी, दोन मित्र आणि केतन असे आम्ही मिळून जाऊन वाढदिवसापूर्वीची ‘सरप्राइज पार्टी’ करणार असल्याचे सांगितले. सियाच्या हट्टानंतर केतनने किल्ल्यावर जाण्यास परवानगी दिली होती, अशी माहिती केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना व्यक्त केली. विशाल अग्रवाल म्हणाले, ज्या वेळी घटना घडली तेव्हा आम्ही तातडीने लाेहगड किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचलो. मृत अवस्थेत मुलगा पाहिल्यानंतर माझ्यासह कुटुंबाला धक्का बसला. कारण त्याचे तोंड व डोक्याच्या पाठीमागील बाजू दोन्ही फुटलेल्या अवस्थेत होते. त्याच्या पायात बूट देखील नव्हते. सिया हिच्या पायात देखील बूट नव्हते. केतनचा मृतदेह पाहूनही तिच्या चेहऱ्यावर भावी पतीच्या निधनानंतर दिसायला हवे ते दुःख दिसले नाही. त्यामुळे मला संशय आला होता. दोघांच्या बुटांबाबत मी विचारणा केल्यानंतर तिने कारमध्ये बूट ठेवल्याचे उत्तर दिले होते, परंतु नंतर केतन पडलेल्या दरीतच त्याचे बूट देखील सापडले. तिचे बूट कुठे गेले, हे माहिती नाही. लग्न ठरवताना सिया बीबीए शिकत असल्याची माहिती, प्रत्यक्षात मात्र १२ वी झाली नाही, आमचे कुटुंब उद्ध्वस्त झाले सियाचे दारू पिण्याचे व्हिडिओ माध्यमात येऊनही आपली मुलगी दारू पीत नव्हती, हे स्पष्टीकरण देणे चुकीचे आहे. लग्न ठरवताना मुलगी बीबीएच्या दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत असल्याचे आम्हाला सांगण्यात आले होते. परंतु प्रत्यक्षात ती १२ वीदेखील झाली नव्हती, असे आता प्रसारमाध्यमांतून स्पष्ट होते. माझा मुलगा अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन भारतात परतला होता. त्याच्या आयुष्यात अनेक स्वप्ने होती, परंतु अशी दुर्दैवी घटना त्याच्याबाबत घडली. आमचे संपूर्ण कुटुंब आता उद्ध्वस्त झाले आहे. केतनने माझीच कार तेव्हा नेली होती केतनने माझीच कार तेव्हा नेली होती. कारमध्ये बूट असल्याचे मला कधी दिसून आले नव्हते. घटनेनंतर सियाने ज्या मित्र-मैत्रिणींची माहिती आम्हाला दिली होती, त्यांच्याकडे आम्ही विचारणा केली. त्यांनी आम्ही लाेहगडवर गेलोच नव्हतो असे सांगितले. गोयल यांची दुहेरी भूमिका प्रवीण गोयल यांनी दुहेरी भूमिका घेऊ नये. आपली मुलगी दोषी असेल तर तिला फाशीची शिक्षा दिली पाहिजे, असे सियाचे वडील प्रवीण गोयल म्हणतात, परंतु दुसऱ्या बाजूला न्यायालयात तिची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी दर्जेदार वकील देखील देतात. याबाबत विशाल अग्रवाल म्हणाले, गोयल यांनी अशा प्रकारे दुहेरी भूमिका घेऊ नये. या प्रकरणात सियाशिवाय तिचे आई-वडील, भाऊ तसेच लग्नात मध्यस्थी करणारे नरेंद्र मित्तल व रेणू मित्तल देखील कटात सहभागी आहेत. त्यांची सखोल चौकशी झाली पाहिजे.
Source link
सियाच्या हट्टानंतर केतनने लोहगडावर जाण्यास दिली परवानगी:केतनचे वडील विशाल अग्रवाल यांची ‘दिव्य मराठी’शी बोलताना माहिती, तिच्या चेहऱ्यावर कुठलेही दु:ख आम्हाला दिसले नाही