![]()
पुण्यात एका खासगी शिकवणी वर्गात गुंतवणुकीचे आमिष दाखवून एका ज्येष्ठ नागरिकाची साडेपंधरा लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी ‘लातूर पॅटर्न’ या खासगी शिकवणी वर्गाचे चालक विष्णू धोडींराम बिराजदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी ज्येष्ठ नागरिक 70 वर्षांचे असून, ते पिंपरी-चिंचवडमधील ताथवडे परिसरात राहणारे सेवानिवृत्त व्यक्ती आहेत. त्यांची बिराजदार यांच्याशी 2021 मध्ये ओळख झाली होती. बिराजदार यांनी त्यांना शिकवणी वर्गात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. या आमिषाला बळी पडून ज्येष्ठ नागरिकांनी वेळोवेळी बिराजदार यांना साडेपंधरा लाख रुपये दिले. मात्र, पैसे घेतल्यानंतर बिराजदार यांनी त्यांना कोणताही परतावा दिला नाही. परताव्याबाबत विचारणा केली असता, त्यांनी टाळाटाळ करण्यास सुरुवात केली. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांनी नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. विश्रामबाग पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून, पोलिस उपनिरीक्षक भंडारे हे तपास अधिकारी आहेत. डंपरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू दरम्यान, पुणे महापालिका भवन परिसरात डंपरच्या धडकेत एका पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी डंपर चालक आनंद सुरेश ठाकरे (वय 26, रा. साधू वासवानी उड्डाणपुलाजवळ, क्वीन्स गार्डन) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. हा अपघात 19 जुलै रोजी रात्री नऊच्या सुमारास घडला. डंपर चालक ठाकरे हा महापालिका भवन परिसरातून जात असताना, पीएमपी थांब्याजवळ त्याच्या डंपरने एका पादचाऱ्याला धडक दिली. या अपघातात पादचारी गंभीर जखमी झाला आणि उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितले. पोलिसांनी डंपर चालक ठाकरे याला ताब्यात घेतले आहे. चौकशीदरम्यान, ठाकरे याच्याकडे चारचाकी वाहन चालविण्याचा परवाना नसल्याचे समोर आले. अपघातग्रस्त पादचाऱ्याची ओळख अद्याप पटलेली नाही. तो फिरस्ता असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. पोलिस उपनिरीक्षक अमोल ओमासे या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Source link
लातूर पॅटर्न शिकवणी चालकाकडून ज्येष्ठाची फसवणूक:गुंतवणुकीवर मोठ्या परताव्याचे आमिष दाखवत साडे पंधरा लाखांना गंडा, गुन्हा दाखल