![]()
देशातली 95 % जनता मोदी सरकारच्या विरोधात आहे. मोहन भागवत यांच्या सल्ल्यामागचे कारण तरुणांचा वाढता असंतोष. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना स्वतःचा बचाव करण्यासाठी व्हिडिओ पोस्ट करण्याची वेळ आली आहे. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांना स्वतःचा बचाव करण्यासाठी अशा पद्धतीने व्हिडिओ प्रसिद्ध करण्याची वेळ आली नव्हती, अशी टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली. वडेट्टीवार म्हणाले की, ‘नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या व्हिडिओला मिळालेल्या शेकडो मिलियन रीचचा मोठा गाजावाजा केला जात आहे. पण ही रीच जनतेच्या प्रेमाची नसून भाजपच्या आयटी सेलच्या भाड्याच्या टट्टूंनी निर्माण केलेली कृत्रिम हवा आहे,’ असा टोलाही त्यांनी हाणला. वडेट्टीवार यांनी मीडियाशी संवाद साधला. तसेच सोशल मीडियावर पोस्ट करून प्रखर शब्दांत टीका केली. वडेट्टीवार म्हणाले की, ‘आज सोशल मीडियावर नजर टाकली तर 95 टक्के लोक नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या विरोधात बोलताना दिसत आहेत. बेरोजगारी, पेपर लीक, महागाई आणि तरुणांच्या भविष्याच्या प्रश्नांवर देशभरातून संताप व्यक्त होत आहे. आजपर्यंत कोणत्याही पंतप्रधानांच्या प्रतिमेवर सोशल मीडियावर एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित झाले नव्हते, जितके आज नरेंद्र मोदींच्या प्रतिमेबाबत उपस्थित होत आहेत. त्यामुळेच भाड्याच्या टट्टूंमार्फत वातावरण बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण प्रचाराने वास्तव बदलत नाही. देशातील तरुण आता जागा झाला आहे. ज्या तरुणांच्या विश्वासावर सत्ता मिळाली, तोच तरुण लोकशाहीच्या मार्गाने या सत्तेला उत्तर देईल. जनतेचा कौल हा कोणत्याही आयटी सेलपेक्षा मोठा असतो,’ असा टोलाही त्यांनी लगावला. वडेट्टीवार म्हणाले की, ‘मोहन भागवत यांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदींना सल्ला द्यावा वाटत आहे, यामागे देशातील तरुणांचा वाढता असंतोष दडलेला आहे. रोजगाराचा प्रश्न, पेपर लीकच्या घटना, भरती प्रक्रियेतील विलंब आणि भविष्याबाबतची असुरक्षितता यामुळे देशातील तरुणांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली आहे. ज्या तरुणांच्या विश्वासावर नरेंद्र मोदी सत्तेपर्यंत पोहोचले, त्याच तरुणांचा आज सरकारवरील विश्वास ढासळत आहे. तरुण रस्त्यावर उतरला आहे आणि आपल्या भविष्याचा हिशेब मागत आहे. सर्व काही हातातून निसटू लागल्यानंतरच सल्ल्याची आठवण होणे, हेच सरकारच्या अपयशाचे सर्वात मोठे प्रतीक आहे. देशातील तरुणांच्या प्रश्नांकडे वेळेत लक्ष दिले असते, तर आज अशी परिस्थिती निर्माण झाली नसती.’
Source link
पंतप्रधानांची बचावासाठी VIDEO पोस्ट:देशातली 95% जनता मोदी सरकारच्या विरोधात; भागवतांच्या सल्ल्यामागे तरुणांचा वाढता असंतोष – वडेट्टीवार