Headlines

गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध:मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांचे प्रतिपादन




पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सब का साथ, सबका विकास’ या मूलमंत्रावर आधारित गुजरात विकासाचे प्रारूप देशपातळीवर सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी केले. दि पूना गुजराथी केळवणी मंडळाच्या शताब्दी सांगता समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. स्वारगेट येथील गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी व्यासपीठावर महापौर मंजुषा नागपुरे, दि पूना गुजराथी केळवणी मंडळाचे चेअरमन डॉ. राजेश शहा, व्हाईस चेअरमन जनक शहा, सचिव हेमंत मणियार, विश्वस्त जितेंद्र मेहता, किरीट शहा, सहसचिव विनोद देडीया, संदीप शहा, दिलीप जागड, प्रमोद शहा, खजिनदार महेश धारोड आणि विश्वस्त कीर्तीभाई शहा उपस्थित होते. यावेळी बोलताना मुख्यमंत्री पटेल म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात ‘व्हायब्रंट गुजरात’च्या माध्यमातून विकासाची गंगा गुजरातमध्ये आणली. त्यांनी केवळ वाळवंट नसून विकासाच्या एकाहून एक सरस गौरव गाथा निर्माण केल्या. मातृभाषा आणि मातृभूमीबद्दल अभिमान बाळगणाऱ्या पंतप्रधान मोदींनी संपूर्ण देशासह गुजरातमध्ये विकासाची गाथा लिहिली आणि लघु उद्योगांचे जाळे विणले. गुजरातच्या विकासाचा रोडमॅप केवळ कागदावर न ठेवता, तो प्रत्यक्षात आणला. आजही पंतप्रधान पदावरून देशाच्या विकासरथाचे सारथ्य करत असताना, समाजातील तळागाळातील व्यक्तींना केंद्रस्थानी ठेवून त्यांनी विविध योजना आखल्या आहेत. यातून नरेंद्र मोदींची दूरदृष्टी दिसून येते. गुजराती समाज जिथे जातो तिथे एकरूप होऊन जातो, हे या समाजाचे वैशिष्ट्य आहे. महाराष्ट्रात स्थायिक गुजराती समाजाने राज्याच्या विकासात योगदान दिले असून, कोरोनासारख्या कठीण काळातही समाजसेवेचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. नरेंद्र मोदींच्या सक्षम नेतृत्वाखाली गुजरात राज्य विकासाचे मैलाचे दगड प्रस्थापित करत आहे. त्यांनी औद्योगिक क्रांतीपासून दळणवळण सुविधा निर्माण केल्या. सेमीकंडक्टर क्षेत्रात भारत भरीव कामगिरी करू शकेल का, अशी शंका व्यक्त केली जात असताना, मोदींनी गुजरातमध्ये सेमीकंडक्टर निर्मितीचे तीन भव्य प्रकल्प उभे केले. पायाभूत सुविधा आणि बंदरांचा विकास करून, सुमारे ४०% व्यापार गुजरातच्या बंदरांमधून नियंत्रित होतो आहे. पर्यावरणाबाबत प्रचंड सजगता दाखवत ‘एक पेड मा के नाम’ सारखी हरित चळवळ त्यांनी उभी केली, तसेच रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि हायड्रोजनवर धावणारी रेल्वे यांसारखे विकासात्मक प्रकल्प प्रत्यक्षात आणले. विकसित देशांमध्ये असलेले अनेक प्रकल्प मोदींनी भारतात राबवले आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *