.

जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे आळे येथील प्रयोगशील शेतकरी विकास हरिभाऊ चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन आणि ‘सुपरकेन’ रोपवाटिका तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून ऊस उत्पादनात लक्षणीय वाढ साधली. त्यांच्या ४० एकर शेतीमध्ये प्रति एकर सरासरी ८२ टन ऊस उत्पादन मिळत आहे. एका हंगामात एकरी सुमारे २ लाख ३० हजार रुपयांचा निव्वळ नफा मिळतो. उत्पादन खर्च सुमारे ७० हजार रुपयांपर्यंत येतो. विकास हे २०१४ पासून या तंत्रज्ञानाचा प्रयोग करत आहेत. यापूर्वी पारंपरिक पद्धतीने ऊस शेती करताना त्यांना प्रति एकर ६५ ते ७० टनांपर्यंत उत्पादन मिळत होते. मात्र, बी.एस्सी. ॲग्री शिक्षणानंतर त्यांनी परिसरातील शेतीचा इतिहास व जमिनीच्या सुपीकतेचा अभ्यास करून डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांच्या तंत्रज्ञानावर आधारित ‘सुपरकेन रोपवाटिका’ संकल्पनेचा अवलंब केला. शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गादीवाफ्यावर सशक्त ऊस रोपे तयार करून त्यानंतर लागवड करायची, अशी ही पद्धत आहे. रोपे तयार होईपर्यंत शेतात पाटाचे पाणी देण्याची आवश्यकता नसल्याने त्यांच्या ४० एकर क्षेत्रात सुमारे दीड कोटी लिटर पाण्याची बचत झाली आहे. एक डोळ्याच्या टिपऱ्या योग्य पद्धतीने तयार करून त्यांची बेणे प्रक्रिया केली जाते आणि गादीवाफ्यावर त्यांची एकसारख्या पद्धतीने लागवड केली जाते. पूर्वहंगामी, सुरू आणि खोडवा ऊस या प्रकारांनुसार उत्पादनाचा कालावधी व उत्पादकता बदलते. पश्चिम महाराष्ट्रात सरासरी प्रति एकर ३८ ते ४२ टन ऊस उत्पादन मिळत असताना, चव्हाण यांनी सेंद्रिय कर्ब संवर्धन, पाचट व्यवस्थापन, योग्य बेणे आणि ‘सुपरकेन’ च्या माध्यमातून प्रति एकर सरासरी ८२ टनांपर्यंत ऊस उत्पादन घेतले. ही बातमी इतरांना शेअर करण्यासाठी शेजारचा क्यूआर कोड स्कॅन करा. विकास चव्हाण या प्रगतिशील शेतकऱ्याकडून जाणून घ्या अधिक माहिती 9503205483 आपणही शेतकरी आहात. अनोख्या प्रयोगांची संपूर्ण माहिती, छायाचित्र-व्हिडिओ आपल्या नाव व पत्त्यासह 8888840081 या व्हॉट्सअॅपवर पाठवावी. मात्र ही माहिती यापूर्वी वृत्तपत्रात, सोशल मीडियावरही प्रसिद्ध झालेली नसावी. काय आहे ‘सुपरकेन’ रोपवाटिका? ‘सुपरकेन’ म्हणजे कमी पाण्यात आणि कमी बियाण्याचा वापर करून शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गादीवाफ्यावर तयार केलेली ऊस रोपवाटिका होय. या पद्धतीत एक डोळ्याच्या टिपऱ्यांची निवड करून त्यावर बेणे प्रक्रिया केली जाते. सुमारे सहा फूट रुंद आणि ५० फूट लांबीच्या सपाट वाफ्यामध्ये डीएपी किंवा सुपर फॉस्फेटच्या रिकाम्या पिशव्या अंथरल्या जातात. त्यावर सुमारे दोन इंच मातीचा थर देऊन एक डोळ्याच्या टिपऱ्यांची लागवड केली जाते. नंतर टिपऱ्यांवर झाकण होईल एवढा मातीचा थर देऊन पाणी देतात.