![]()
कवयित्री शोभाताई हांगे यांच्या ‘मनातले मोती’ या कवितासंग्रहाचे पुण्यात प्रकाशन झाले. याप्रसंगी पुणे शहराच्या अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी शोभाताईंच्या कवितांमधून ग्रामीण स्त्रीजीवनाचे वास्तव पण सकारात्मक दर्शन घडते, असे प्रतिपादन केले. सातपुते म्हणाल्या, “जसे मनात उमटले तसे कागदावर आणण्याचे धाडस आणि पराकोटीचा प्रामाणिकपणा, ही त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये आहेत.” नव्या पेठेतील पत्रकार भवन येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी कवयित्री शोभाताई हांगे यांच्यासह निवेदिका लीनता माडगूळकर आंबेकर, समाजसेविका सारिका भरणे, पुणे जिल्हा परिषद महिला व बालकल्याण सभापती अंकिता पाटील आणि वक्ते प्रा. गणेश शिंदे व्यासपीठावर उपस्थित होते. या सोहळ्याला शिवाजीराव हांगे, सत्यजीत हांगे, अजिंक्य हांगे, छाया घुले, दुर्गा वाघ, चंद्रकला सानप, शशिकला मुंढे यांच्यासह हांगे कुटुंबीय आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अतिरिक्त पोलिस आयुक्त तेजस्वी सातपुते यांनी यावेळी सांगितले की, त्या स्वतः एका कवयित्री आईच्या कन्या आहेत आणि आईच्या कवितांचे पुस्तक प्रकाशित करण्याचा अनुभव त्यांनी घेतला आहे. त्या म्हणाल्या, “शोभाताईंनी ग्रामीण जीवनात दीर्घकाळ वास्तव्य केले आहे. जुन्या काळातील परिस्थितीचा विचार करता, त्यांनी सोसलेल्या दुःखातून त्यांच्या कवितांचा जन्म झाला आहे.” त्यांच्या कविता व्यथा आणि वेदना मांडत असल्या तरी त्या नकारात्मक नाहीत. शोभाताईंमधील मातृत्व तेजस्वी असून, त्यांच्या कवितेतून प्रांजळ, निखळ आणि सरळ मनाचे प्रतिबिंब दिसते. या कविता केवळ प्रकाशनासाठी नव्हे, तर त्यांनी अनुभवलेले जीवन कागदावर उतरवण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे, असेही सातपुते यांनी नमूद केले. आपले मनोगत व्यक्त करताना कवयित्री शोभाताई हांगे म्हणाल्या, “हा कवितासंग्रह केवळ एक पुस्तक नसून, तो माझ्या जीवनप्रवासाचा आरसा आहे.” ग्रामीण भागातील स्त्रियांना सहसा व्यक्त होण्याची संधी मिळत नाही आणि त्यांच्याकडे साधनेही नसतात, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, संसार वाढत गेला तसतसे वेगवेगळ्या पातळ्यांवर सोसणेही वाढले. तेव्हा त्यांनी कागद आणि पेन जवळ केले आणि त्यातून कविता जन्माला आल्या. त्यांच्या वेदना आणि अनुभव शब्दरूपात कागदावर उतरू लागले. या कविता त्यांच्यासाठी शक्ती ठरल्या आणि धीर देणाऱ्या सख्यांसारख्या होत्या. आजही ग्रामीण भागातील अनेक स्त्रियांचे आयुष्य ‘रांधा-वाढा’ या चक्रातच निघून जाते आणि त्यांना मनासारखे जगण्याची संधी मिळत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. आपण सुदैवी ठरलो कारण आपल्याला विश्वास ठेवणारे पती मिळाले, ज्यांनी साथ दिली. तसेच कुटुंबियांनीही पाठिंबा दिला, ज्यामुळे हा संस्मरणीय क्षण अनुभवता आला, असे शोभाताईंनी कृतज्ञतापूर्वक सांगितले. प्रा. गणेश शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले की, संवाद आणि परिवर्तनाची सुरुवात अंतर्मनातून होते, तेव्हाच कवितेचा जन्म होतो. शोभाताईंच्या कविता अशाच अंतर्मनातून आलेल्या आहेत. या ग्रामीण बाजाच्या कविता नातेसंबंध, ग्रामीण जीवन आणि त्यातील संघर्ष यावर प्रकाश टाकतात, असेही प्रा. शिंदे यांनी नमूद केले.
Source link
'मनातले मोती' कवितासंग्रहाचे प्रकाशन:शोभाताईंच्या कवितांमधून सकारात्मक स्त्रीजीवनाचे दर्शन: तेजस्वी सातपुते