![]()
भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर तथा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण तज्ज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी सैनिकांच्या योगदानावर भाष्य केले. सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीप्रती असलेल्या प्रेमापोटी लढतात, असे प्रतिपादन त्यांनी केले. सैन्यातील रेजिमेंटल भरतीमुळे एकात्मतेची भावना दृढ होते आणि सैनिक धर्म व देशाच्या रक्षणासाठी लढतात, असेही ते म्हणाले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 1910 साली मार्सेलिस बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक समुद्रउडीच्या स्मरणार्थ ‘साहस दिन’ साजरा करण्यात आला. या निमित्ताने हर घर सावरकर प्रतिष्ठान, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे नगर हिंदुसभा यांच्या संयुक्त विद्यमाने पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. डेक्कन जिमखाना येथील आयएमडीआर कॉलेजच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात हा कार्यक्रम पार पडला. या सोहळ्यात यावर्षीचा ‘साहस पुरस्कार’ गोरक्षक सुधीर महादेव बहिरवाडे यांना प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाला विनायक डावरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्यासोबत हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, पुणे शहराचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सात्यकी सावरकर आणि विद्याधर नारगोलकर यांचीही प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना विनायक डावरे यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या कार्यावर प्रकाश टाकला. महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतात सावरकरांना अधिक मान दिला जातो, तसेच उत्तर प्रदेशात त्यांचे मंदिरही उभारण्यात आले आहे, असे त्यांनी सांगितले. हिंदू समाजात एकता निर्माण करण्यासाठी सावरकरांनी आयुष्यभर कार्य केले. ‘बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे’ हा संदेश लक्षात ठेवून हिंदू समाजाने एकजूट राखली पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सावरकरांनी शंभर वर्षांपूर्वीच ही गोष्ट ओळखली होती, असेही ते म्हणाले. पुरस्कार स्वीकारल्यानंतर सुधीर बहिरवाडे यांनी आपले विचार मांडले. जातिवाद पूर्वीपासून नव्हता, तो नंतर समाजात पेरला गेला आणि जातिभेद जाणीवपूर्वक बिंबवण्यात आला, असे ते म्हणाले. इतिहासात हिंदू धर्मावर अनेक आघात झाले असून, आज ‘लव्ह जिहाद’पेक्षा ‘लँड जिहाद’ हा अधिक गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. घराघरांत सावरकर घडले, तर हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होण्यास फार काळ लागणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
Source link
सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीच्या प्रेमापोटी लढतात:विंग कमांडर डावरे यांचे प्रतिपादन; साहस दिनानिमित्त पुरस्कार सोहळा