Headlines

अजिंक्यतारा किल्ला व संगम माहुली विकास कामांना प्रशासकीय मंजुरी:कामे वेगाने व दर्जेदार करण्याच्या बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या सूचना




सातारा येथील ऐतिहासिक अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन व परिसर सुशोभीकरणासाठी 134.80 कोटी आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळाचे संवर्धन, जीर्णोद्धार तसेच परिसर विकसित करण्याच्या रक्कम रुपये 132.95 कोटींच्या कामास प्रशासकीय मंजुरी मिळाली आहे. ही दोन्ही कामे वेगाने करण्यासोबतच सर्व कामे दर्जेदार करा, दर्जाबाबत कसलीही तडजोड करू नका, असे स्पष्ट निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात शिवेंद्रसिंहराजे यांनी बैठक घेऊन अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन व संवर्धन, परिसर सुशोभीकरण आणि संगम माहुली येथील महाराणी ताराबाई, महाराणी येसुबाई व छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीस्थळांचे संवर्धन, जीर्णोद्धार आणि परिसर विकसित करण्याचा कामाचा आढावा घेतला. यावेळी ते बोलत होते. बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, नगराध्यक्ष अमोल मोहिते, नगरसेवक अविनाश कदम, अक्षय जाधव, फिरोज पठाण, सचिन कांबळे, कन्हैयालाल राजपुरोहित, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल गावडे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, पुरातत्व विभागाचे सहसंचालक डॉ. विलास वाहने, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीपाद जाधव, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात, श्रीराम कुलकर्णी, इंद्रजित नागेशकर (दूरदृष्यं प्रणालीद्वारे) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन-संवर्धन आणि संगम माहुली येथील विकासकामांच्या बांधकाम कामांची निविदा एकत्रित काढावी, अशा सूचना ना. शिवेंद्रसिंहराजेंनी दिल्या. अजिंक्यतारा किल्ला संवर्धन कामात विविध ठिकाणी पायवाटा तयार करण्यात येणार आहेत. रात्रीच्या वेळी किल्ल्यावर वन्य प्राण्यांचा वावर असतो, त्यामुळे प्रकाश केवळ पायवाटांवर पडेल अशा स्वरूपाचे दिवे बसवावेत. संवर्धनाच्या कामातून निधी शिल्लक राहिल्यास खिंडीतील गणपती मंदिरापासून अजिंक्यतारा किल्ल्यावर जाण्यासाठी पायवाट तयार करावी. या कामांच्या संदर्भाने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष अजिंक्यतारा किल्ल्याची पाहणी करावी, अशी सूचना शिवेंद्रसिंहराजे यांनी केली. संगम माहुली येथील कामाचा आढावा घेताना ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, संगम माहुलीच्या प्रवेशद्वारापासून गावापर्यंतचा रस्ता काँक्रीटचा करावा व रस्त्याची रुंदी वाढवावी. यासाठी स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात घेऊन चर्चा करावी. तसेच संगम माहुली येथे पार्किंग व्यवस्थेसह गावातील सर्व गटारे बंदिस्त करावीत. प्रवेशद्वारावरील कमान आकर्षक नवीन डिझाइननुसार नव्याने उभी करावी. अजिंक्यतारा किल्ला आणि संगम माहुली येथील कामे करताना गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नका. ही दोन्ही कामे सातारा शहरातील नागरिकांच्या कायम स्मरणात राहतील अशा पद्धतीने उत्कृष्ट दर्जाची करावीत, अशा सूचनाही त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केल्या.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *