![]()
संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याप्रकरणी नाशिकच्या विशेष तपास पथकाने आतापर्यंतची सर्वांत मोठी आणि धडक कारवाई केली आहे. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी असणारा बडा शिक्षण संस्थाचालक आणि भाजप पदाधिकारी संजय गरुड याला नाशिक गुन्हे शाखेने सोमवारी रात्री सोलापूर जिल्ह्यातील नातेपुते येथील एका फार्महाऊसमधून शिताफीने ताब्यात घेतले. संजय गरुड हे मूळचे जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील शेंदूर्णी येथील मोठे शिक्षण संस्थाचालक आहेत. काही महिन्यांपूर्वीच, 20 जानेवारी 2024 रोजी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला होता. ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यातील हा सर्वात मोठा मासा पोलिसांच्या गळाला लागल्याने आता या प्रकरणातील अनेक गूढ आणि लपलेले धागेदोरे उलगडण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सोलापूर पोलिसांनी सापळा रचून केली अटक जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून 259 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमबाह्य वैयक्तिक मान्यता दिल्याप्रकरणी त्यांना काही दिवसांपूर्वी पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान हे बहुतांश शिक्षक बडा शिक्षण संस्थाचालक संजय गरुड यांच्याच संस्थांमधील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हिंगोणीकर यांनी पुरवलेल्या गोपनीय माहितीच्या आधारेच एसआयटीच्या पथकाने सोलापुरात यशस्वी सापळा रचून संजय गरुडच्या मुसक्या आवळल्या. 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर पोलिसांच्या सखोल तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, या बहुचर्चित ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्यात नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांतील तब्बल 841 शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावांचा गैरवापर करण्यात आला आहे. यात मुख्य आरोपी संजय गरुड याच्या 15 शैक्षणिक संस्थांमधील 177 कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता देण्यात आल्याचे उघड झाले असून, याच बनावट आदेशांच्या आधारे राज्य शासनाची तब्बल 160 कोटी रुपयांची मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या संपूर्ण रॅकेटमध्ये आतापर्यंत उघडकीस आलेल्या 481 कर्मचाऱ्यांपैकी तब्बल 438 कर्मचारी हे एकट्या जळगाव जिल्ह्यातील आहेत. तर या घोटाळ्याप्रकरणी गजाआड झालेला संजय गरुड हा सहावा आरोपी ठरला आहे.
Source link
शालार्थ आयडी' घोटाळा:भाजप पदाधिकारी संजय गरुड यांना सोलापुरातून अटक, फार्महाऊसवर छापा मारून SITची मोठी कारवाई