Headlines

जेवड शाळेमध्ये बालसंसद निवडणूक; विद्यार्थ्यांनी घेतले प्रत्यक्ष मतदानाचे धडे:विद्यार्थ्यांनी बजावला मतदानाचा हक्क, एसआयआर जनजागृतीसाठी पुढाकार‎


.

लोकशाही मतदानापुरती मर्यादित नसून, ती जबाबदार नागरिक घडविण्याची प्रक्रिया आहे. हीच संकल्पना कृतीतून विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवताना म.न.पा. प्राथमिक व माध्यमिक शाळा, जेवड येथे बालसंसद निवडणुकीचे आयोजन केले. या निवडणूक प्रक्रियेचा उपयोग स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन मोहिमेबाबत पालक व नागरिकांत जागरूकता निर्माण करण्यासाठी केला. विद्यार्थ्यांनी मतदान करून, निवडणुकीतील जबाबदाऱ्या स्वीकारुन लोकशाहीची तत्त्वे आत्मसात केली, तर त्याचवेळी एसआयआर प्रक्रियेचे महत्त्व घराघरांत पोहोचवले.

शाळेच्या परिसरात खऱ्या निवडणुकीचे वातावरण निर्माण केले होते. मतदार यादी, उमेदवारी अर्ज, प्रचार, मतदान केंद्र, मतदान पेटी, शाईचा वापर, मतदान अधिकारी, मतमोजणी यासह सर्व प्रक्रिया निवडणूक आयोगाच्या धर्तीवर राबवल्या. विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेची माहिती घेतली.

विद्यार्थ्यांनी मतदानाचे महत्त्व समजून घेतल्यामुळे त्यांच्यात सामाजिक जबाबदारीची जाणीव निर्माण झाली. भविष्यात सक्षम, जागरूक नागरिक घडवण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे शिक्षकांनी नमूद केले. बालवयातच लोकशाही मूल्यांचे संस्कार झाल्यास विद्यार्थी भविष्यात जबाबदार मतदार, नेतृत्वक्षम नागरिक म्हणून घडतील, असा विश्वास व्यक्त केला. या उपक्रमाचे आयोजन मनपा शिक्षणाधिकारी डॉ. प्रकाश मेश्राम, मुख्याध्यापक प्रशांत नालसे यांच्या मार्गदर्शनात केले. नियोजन, अंमलबजावणीत श्याम गोंगे, शिरीष फसाटे, जितेंद्र चवरे, सीमा शिरभाते, प्रिया मारोडकर, भूषण वाघ, आकाश पोंगळे आणि सुनील डहाके यांनी योगदान दिले. प्रत्यक्ष बीएलओ, सहाय्यक म्हणून कार्यरत किरण नालिंदे, वैशाली बुटे, चंचल दातीर, हर्षा दिवे, पुष्पा कोरडे, सोनाली चापके, किरण शेंडे, वर्षा यावलकर आणि मंगला अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना एसआयआर प्रक्रियेची माहिती देत जनजागृती मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला.

लोकशाहीचे शिक्षण, नेतृत्व विकास, सामाजिक उत्तरदायित्व, मतदार जागरूकता या चारही बाबींचा संगम घडवून आणणारा हा उपक्रम इतर शाळांसाठीही मार्गदर्शक ठरत आहे. बालसंसद निवडणुकीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी लोकशाहीचा अनुभव घेतला, एसआयआर मोहिमेलाही जनसहभाग मिळवून देण्याचा प्रयत्न यशस्वी ठरला. अशा उपक्रमांमुळे शाळा शिक्षणाचे केंद्र न राहता समाजपरिवर्तनाचे प्रभावी माध्यम बनत असल्याचे या उपक्रमाने अधोरेखित केले.

प्रचारापासून मतदानापर्यंत निवडणूक प्रक्रिया ः निवडणूक प्रक्रियेला १७ जुलैपासून सुरुवात झाली. सर्वप्रथम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात आली. त्यानंतर इच्छुक विद्यार्थ्यांकडून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात आले. अर्जांची छाननी, अर्ज मागे घेण्याची मुदत, निवडणूक चिन्हांचे वाटप, प्रचार मोहीम आणि आचारसंहितेचे पालन या टप्प्यांतून निवडणूक पुढे सरकली. प्रचारादरम्यान उमेदवार विद्यार्थ्यांनी विविध आश्वासने देत सहाध्यायांचे मत मिळविण्यासाठी प्रयत्न केले.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *