![]()
महावितरणच्या अचलपूर, अमरावती शहर व अमरावती ग्रामीण विभागांतर्गत प्रसिद्ध करण्यात आलेल्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेची अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊनही अद्याप पुढील कार्यवाही करण्यात आलेली नसल्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांमध्ये तीव्र नाराजी आहे. रखडलेली भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी उमेदवारांनी संयुक्त निवेदनाद्वारे महावितरणच्या मुख्य अभियंत्यांकडे केली आहे. जिल्ह्यातील आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांनी महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेसाठी अर्ज केले होते. मात्र, अर्ज प्रक्रिया पूर्ण होऊन बराच कालावधी लोटला तरी भरती प्रक्रियेबाबत कोणतीही पुढील कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे उमेदवारांच्या संयमाचा अंत होत असून, त्यांच्या शैक्षणिक व रोजगाराच्या नियोजनावर परिणाम होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.या संदर्भात संबंधित तिन्ही विभागांकडे यापूर्वी संयुक्त निवेदन सादर करून आवश्यक कार्यवाहीची मागणी करण्यात आली होती. मात्र, अद्याप समाधानकारक कार्यवाही न झाल्याने उमेदवारांमध्ये नाराजी वाढत असल्याचे सांगण्यात आले. जिल्ह्यातील सर्व ठिकाणच्या अप्रेंटिस अर्जदार उमेदवारांचे अर्ज तातडीने तपासून, संबंधित विभागांतील अप्रेंटिस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन संबंधित विभागांकडून तातडीने आढावा घेण्यात यावा आणि आवश्यक मार्गदर्शन करून भरती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणीही करण्यात आली. भरती प्रक्रियेबाबत करण्यात आलेल्या कार्यवाहीची माहिती उमेदवारांना लेखी स्वरूपात देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या १५ ऑगस्टपर्यंत भरती प्रक्रियेबाबत योग्य कारवाई न झाल्यास उमेदवारांकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही निवेदनातून देण्यात आला आहे. उमेदवारांमध्ये अस्वस्थता निवेदनाची प्रत कार्यकारी अभियंता महावितरण ग्रामिण विभाग अमरावती,मुख्य अभियंता महावितरण अमरावती झोन, अधीक्षक अभियंता महावितरण, कार्यकारी अभियंता महावितरण अचलपूर विभाग यांना निवेदन देण्यात आली आहे. महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेला विलंब होत असल्याने आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून, संबंधित प्रशासनाने तातडीने निर्णय घेऊन भरती प्रक्रिया मार्गी लावावी, अशी मागणी उमेदवारांकडून करण्यात येत आहे.
Source link
महावितरणच्या अप्रेंटिस भरती प्रक्रियेस विलंब; उमेदवार त्रस्त:भरती प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची मागणी