Headlines

सातारा क्राईम जगत:शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा अंत; घराचे कुलूप तोडून दागिन्यांवर डल्ला




सातारा तालुक्यातील लिंब आवळीमाथा येथे घराशेजारी असलेल्या शोषखड्यात पडून साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना गुरुवारी (दि. ३०) दुपारी घडली. या घटनेमुळे बेलवडे व लिंब आवळीमाथा परिसरात शोककळा पसरली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हर्ष स्वप्नील लोंढे (वय ३ वर्षे ६ महिने, रा. बेलवडे, ता. जि. सातारा) हा आपल्या चुलत आजोबांच्या घरी लिंब आवळीमाथा येथे आला होता. दुपारी घराबाहेर खेळत असताना घराशेजारी असलेल्या शोषखड्यात तो पडला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुतार यांनी तपासणीअंती उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. याप्रकरणी पांडुरंग रामचंद्र सावंत यांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात वर्दी दिली असून, पोलीस हवालदार कुमठेकर अधिक तपास करत आहेत. घराचे कुलूप तोडून सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला सातारा शहरालगतच्या धनगरवाडी परिसरातील युगंधरा रेसिडेन्सीमध्ये बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने सोन्या-चांदीचे दागिने असा ४८ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. ही चोरी १६ ते १८ जुलैदरम्यान घडली. शिल्पा विजय जगदाळे यांच्या घराचे कुलूप तोडून चोरट्याने दोन जोड सोन्याचे कानातील टॉप्स तसेच चांदीचे पैंजण लंपास केले. चोरीचा एकूण ऐवज ४८ हजार ५०० रुपयांचा आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस हवालदार देशमुख तपास करत आहेत. ट्रेडिंगमधून कोट्यवधी परताव्याचे आमिष, सेवानिवृत्त अभियंत्याची लाखो रुपयांची फसवणूक सातारा, – ट्रेडिंगच्या नावाखाली मोठा आर्थिक परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवत अज्ञात सायबर भामट्यांनी साताऱ्यातील एका सेवानिवृत्त अभियंत्याची तब्बल ६९ लाख ४५ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रवीण प्रभाकर शेळके (रा. प्रतापगंज पेठ) यांना व्हॉट्सॲपद्वारे लिंक पाठवून ‘D83-Tranquility Foundation’ या ग्रुपमध्ये सहभागी करून घेण्यात आले. त्यानंतर ‘UP QIB PRO’ या ॲपवर ट्रेडिंग करण्यास प्रवृत्त करून विविध बँक खात्यांमध्ये वेळोवेळी मोठी रक्कम भरून घेण्यात आली. परतावा न मिळाल्याने त्यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल असून पोलीस निरीक्षक संग्राम शेवाळे तपास करत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *