![]()
येथील नगरपरिषद हद्दीत गेल्या पाच वर्षांपासून स्वच्छता व घनकचरा व्यवस्थापनाचे काम करणाऱ्या सफाई कामगार व महिला मजुरांचे ठेकेदारामार्फत आर्थिक व श्रमिक शोषण होत असल्याचा आरोप करत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली असून नगरविकास विभागामार्फत या प्रकरणाची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सादर करण्यात आलेल्या निवेदनात ठेकेदारावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. शासनाने निश्चित केलेल्या ६२२ रुपये किमान दैनिक वेतनाऐवजी कामगारांना केवळ ३८० रुपये मानधन देऊन आर्थिक पिळवणूक केली जात असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. मे, जून आणि जुलै २०२६ या सलग तीन महिन्यांचे वेतन अद्याप न मिळाल्याने सुमारे ५० कामगार कुटुंबांवर उपासमारीची वेळ आल्याचा आरोपही करण्यात आला आहे.तसेच सफाई कामगारांना पीपीई किट, हातमोजे व सुरक्षा बूट यांसारखी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून दिली जात नसल्याने त्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांना रोखीने वेतन देऊन भविष्य निर्वाह निधी (पीएफ) व कर्मचारी राज्य विमा योजना (ईएसआयसी) यांसारख्या कायदेशीर हक्कांपासून वंचित ठेवण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. कामगारांचे थकीत वेतन तातडीने अदा करावे, शासनाच्या किमान वेतनाचा लाभ द्यावा, सुरक्षा साहित्य व कायद्यानुसार सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात तसेच या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. या निवेदनाच्या पाठपुराव्यासाठी शिवसेना गटनेते तथा नगरसेवक संदीप उगले, नगरसेवक सुधीर कबाडे, प्रदीप बनकर, राजू बागवान, नगरसेविका पल्लवी मोरे आदींसह यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, सफाई कामगार आणि महिला मजूर उपस्थित होते.
Source link
चांदवड:सफाई कामगारांच्या आर्थिक शोषणाची तक्रार उपमुख्यमंत्री शिंदेंकडे