![]()
सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील शुल्कवाढीच्या विरोधात अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) पुणे महानगरतर्फे सोमवारी विद्यापीठाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर भर पावसात आंदोलन करण्यात आले. शुल्कवाढ तातडीने मागे घ्यावी, आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना दिलासा द्यावा आणि शुल्कवाढीमागील कारणे जाहीर करावीत, अशी मागणी आंदोलकांनी केली. अभाविपने यापूर्वी 23 जुलै रोजी कुलगुरूंना निवेदन देऊन शुल्कवाढीचा पुनर्विचार करण्याची मागणी केली होती. त्यानंतर 28 जुलै रोजी स्मरणपत्रही देण्यात आले. मात्र, विद्यापीठ प्रशासनाने कोणताही ठोस निर्णय जाहीर न केल्याने विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याचा आरोप अभाविपने केला. आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत शुल्कवाढ रद्द करण्याची मागणी लावून धरली. तसेच शुल्कवाढीमागील आर्थिक कारणे सार्वजनिक करावीत, शासनाकडून अधिक निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करावेत आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी विशेष शुल्कसवलत योजना लागू करावी, अशा मागण्या करण्यात आल्या.
अभाविपच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, नवीन प्रवेशप्रक्रिया सुरू असताना शुल्कवाढीबाबत स्पष्ट भूमिका न घेतल्याने विद्यार्थी व पालक संभ्रमात आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हितासाठी हे आंदोलन करण्यात आले. आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या विद्यार्थ्यांना फी शुल्क वाढीचा तोटा सहन करावा लागत आहे. मुलींच्या शिक्षणावर देखील यामुळे विपरीत परिणाम होत आहे त्यामुळे हे आंदोलन छेडण्यात आलेले आहे. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा पुढील काळात आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा अभाविपने दिला. आंदोलनात अभाविपचे पुणे महानगरातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध शाखांतील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला.
Source link