Headlines

उद्धव ठाकरेंच्या जागेवर थोरात-सपकाळांसह काँग्रेसचे सहा नेते रिंगणात?:विधानपरिषद निवडणुकीत नवा ट्विस्ट




महाराष्ट्र विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 9 जागांसाठी नियमित निवडणूक आणि एका जागेसाठी पोटनिवडणूक अशी एकूण 10 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. मतदान सकाळी 9 ते दुपारी 4 या वेळेत पार पडणार असून त्याच दिवशी सायंकाळी निकाल जाहीर होणार आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 23 एप्रिलला अधिसूचना, 30 एप्रिलपर्यंत अर्ज, 2 मे रोजी छाननी, 4 मेपर्यंत माघार आणि 13 मेपर्यंत संपूर्ण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. या निवडणुकीत राजकीय समीकरणे कशी बदलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विधानसभेतील संख्याबळ लक्षात घेतल्यास भाजपला 5, शिवसेनेला 2, राष्ट्रवादीला 1 आणि महाविकास आघाडीला 1 जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी मोठी चुरस निर्माण झाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे स्वतः उमेदवारी घेणार का, की दुसऱ्या नेत्याला संधी देणार, याबाबत अजूनही स्पष्टता नाही. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसनेही आपली हालचाल सुरू केल्याचे संकेत मिळत आहेत. काँग्रेसकडून विधान परिषदेसाठी अनेक इच्छुकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. पक्षातील ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, मुझफ्फर हुसेन, सचिन सावंत, हनमंत पवार आणि राजेश राठोड यांची नावे चर्चेत आहेत. या सर्व नेत्यांनी उमेदवारीसाठी स्वारस्य दाखवल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीतील एकमेव जागा काँग्रेसकडे जाईल का, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान, शिवसेना ठाकरे गटाने देखील आपली रणनीती आखत असल्याचे दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी उमेदवारी दिल्यास महाविकास आघाडीतील इतर पक्ष त्यांना पाठिंबा देतील, अशी भूमिका काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून यापूर्वी मांडली गेली आहे. मात्र, जर ठाकरे यांनी निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतला, तर शिवसेनेतून अनेक नेत्यांची नावे पुढे येत आहेत. यामध्ये अंबादास दानवे, सुषमा अंधारे, विनायक राऊत, राजन विचारे, वैभव नाईक आणि सूरज चव्हाण यांचा समावेश आहे. या निवडणुकीत सध्याच्या काही आमदारांचा कार्यकाळ संपत असल्यानेही स्पर्धा अधिक रंगणार आहे. यामध्ये उद्धव ठाकरे, नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, अमोल मिटकरी, गोपीचंद पडळकर, रणजितसिंह मोहिते-पाटील, राजेश राठोड, प्रवीण दटके आणि रमेश कराड यांचा समावेश आहे. तसेच प्रज्ञा सातव यांच्या जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नवीन चेहरे संधी मिळवतात का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर समीकरण एकूणच, विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडीतील जागावाटप हा कळीचा मुद्दा ठरणार आहे. काँग्रेसने आपले पर्याय खुले ठेवले असून, शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबतच्या चर्चेनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर या निवडणुकीचे समीकरण मोठ्या प्रमाणावर अवलंबून राहणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवसांत राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे दिसत आहेत.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *