अमरावती जिल्ह्यातील सावर्डीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव ट्रकने कामावरील मजुरांना चिरडले. या भीषण धडकेत ट्रकचालकासह दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले
.
मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती-नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील सावर्डी नजीक असलेल्या रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम सुरू होते. याच दरम्यान नागपूरच्या दिशेने जाणारा एक भरधाव ट्रक अचानक अनियंत्रित झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा ट्रक तेथे आधीच उभ्या असलेल्या एका ट्रकला जाऊन जोरदार धडकला. ही धडक एवढी भीषण होती की, धडकेनंतर ट्रकने रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांनाही फरफटत नेले.
दोघे कामगार वर्धा जिल्ह्यातील
या भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ट्रकचालक शिवचंद श्रीराम पाल याच्यासह कामगार मुकुंदराव गणोरकर आणि देविदास पाटील (दोघेही रा. चित्तूर, ता. आष्टी, जि. वर्धा) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले.
गंभीर जखमींवर उपचार सुरू
या अपघातात इतर तीन कामगार गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक उपचारानंतर जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून वाहतूक पूर्ववत केली असून, याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
जालना-संभाजीनगर महामार्गावर भीषण अपघात
जालना ते छत्रपती संभाजीनगर मुख्य महामार्गावर बदनापूर तालुक्यातील वरुडी परिसरामध्ये भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. भरधाव ट्रकने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरून प्रवास करणारी महिला थेट ट्रकच्या चाकाखाली आली. या अपघातात महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला असून, तिचे पती गंभीर जखमी झाले आहेत.
हे ही वृत्त वाचा
पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात:कंटेनर, टेम्पो आणि कारची धडक; पुण्याकडे जाणारी वाहतूक ठप्प, सुदैवाने जीवितहानी टळली

पुणे-नाशिक महामार्गावरील चाकणजवळील वाकी परिसरात आज पहाटे कंटेनर, टेम्पो आणि कार यांच्यात भीषण अपघात झाला. भरधाव कंटेनर आणि टेम्पोची जोरदार धडक झाल्यानंतर टेम्पो थेट जवळ उभ्या असलेल्या कारवर पलटी झाला. धडकेची तीव्रता इतकी होती की कंटेनरही महामार्गावर आडवा झाला. या अपघातामुळे पुण्याकडे जाणारी वाहतूक काही काळ पूर्णपणे विस्कळीत झाली.
कसा घडला अपघात?
मिळालेल्या माहितीनुसार, पहाटेच्या वेळी कंटेनर आणि टेम्पोमध्ये भीषण टक्कर झाली. या धडकेनंतर नियंत्रण सुटलेला टेम्पो थेट शेजारी असलेल्या एका कारवर जाऊन उलटला. तर, अपघाताच्या तीव्रतेमुळे मोठा कंटेनर महामार्गाच्या मधोमध आडवा झाला. वाचा सविस्तर