![]()
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचे अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्पुरते स्वतःकडे ठेवले होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे त्यावेळी सांगण्यात आले होते. मात्र अधिवेशन संपूनही अर्थ खाते अद्याप मुख्यमंत्र्यांकडेच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसकडून पुन्हा या मुद्द्यावर आवाज उठू लागला आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ‘एक्स’वरील पोस्टद्वारे दिलेल्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. महायुतीतील विश्वास आणि परस्पर सन्मान कायम राखण्यासाठी अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवावे, अशी त्यांनी मागणी केली आहे. अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचाच हक्क अमोल मिटकरी यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, महायुती सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी सोपवली होती आणि त्यांनी ती सक्षमपणे सांभाळली. त्यानंतर अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते तात्पुरते मुख्यमंत्र्यांकडे ठेवण्यात आले. मात्र अर्थसंकल्प मांडल्यानंतर ही जबाबदारी सुनेत्रा पवार यांच्याकडे दिली जाईल, असे मुख्यमंत्री स्वतः जाहीरपणे म्हणाले होते. त्यामुळे या खात्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचाच हक्क असल्याचे त्यांनी नमूद केले. शब्द पाळणे ही परस्पर सन्मानाशी संबंधित बाब मिटकरी यांनी पुढे म्हटले की, अजित पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या लाखो कार्यकर्त्यांच्या मनात आजही या आश्वासनाबाबत अपेक्षा आणि वेदना आहे. महायुतीतील प्रत्येक घटक पक्षाचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही सरकार मजबूत ठेवण्यासाठी सातत्याने जबाबदारीने साथ दिली आहे. त्यामुळे दिलेला शब्द पाळणे ही केवळ राजकीय बाब नसून विश्वास, पारदर्शकता आणि परस्पर सन्मानाशी संबंधित बाब आहे. राष्ट्रवादीच्या इतर आमदारांनाही आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत दिलेले आश्वासन पूर्ण करून अर्थ खाते पक्षाकडे सोपवावे. त्यामुळे महायुतीतील विश्वास अधिक दृढ होईल आणि कार्यकर्त्यांच्या मनातील संभ्रम दूर होईल, अशी विनंतीही त्यांनी केली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व आमदारांनी पक्षाच्या स्वाभिमानासाठी कार्यकर्त्यांच्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहनही त्यांनी केले. अर्थ खात्यावरून पुन्हा चर्चांना उधाण अजित पवार यांच्या निधनानंतर अर्थ खाते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतःकडे ठेवले होते. त्यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर हे खाते पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसकडे दिले जाईल, असे संकेत देण्यात आले होते. मात्र अद्याप त्याबाबत निर्णय झालेला नसल्याने महायुतीतील समन्वय आणि खातेवाटपावर पुन्हा राजकीय चर्चा सुरू झाली आहे. अमोल मिटकरी यांच्या पोस्टमधील “शब्दाला किंमत असते. तो पाळला गेला तर विश्वास वाढतो; आणि विश्वास टिकला तरच युती अधिक मजबूत होते,” या विधानामुळे अर्थ खाते राष्ट्रवादी काँग्रेसकडे देण्याचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला असून, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावर काय निर्णय घेतात याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हेही वाचा.. अमरावती-नागपूर महामार्गावर भीषण अपघात:भरधाव ट्रकने कामगारांना चिरडले; तिघांचा जागीच मृत्यू, तीन जण गंभीर अमरावती जिल्ह्यातील सावर्डीजवळ राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात झाला आहे. महामार्गावर खड्डे बुजवण्याचे काम सुरू असताना भरधाव ट्रकने कामावरील मजुरांना चिरडले. या भीषण धडकेत ट्रकचालकासह दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला असून, अन्य तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. सविस्तर वाचा
Source link
शब्दाला किंमत असते; अर्थ खाते राष्ट्रवादीकडे द्या!:अमोल मिटकरींनी मुख्यमंत्री फडणवीसांना करून दिली वचनाची आठवण