![]()
कुटुंब अत्यंत गरीब आणि आई-वडील ऊसतोडणीला जातात. जगण्यासाठी दररोजचा संघर्ष असल्याने कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देण्यासाठी मी पोलिस खाते निवडले. मला मिळालेले हे यश सावित्रीबाई फुले यांच्या प्रेरणेने आणि आई-वडिलांच्या अफाट कष्टामुळेच शक्य झाले, अशी प्रांजळ भावना मुंबई पोलिस दलात नव्याने रुजू झालेल्या सोनू मुक्ता विष्णुदास राठोड यांनी व्यक्त केली. नुकतेच मुंबई पोलिस दलात भरती झालेल्या परिसरातील तरुण-तरुणींचा सत्कार करण्यात आला. यामध्ये सोनू राठोड (सीता नाईक तांडा), ज्ञानेश्वर व रामेश्वर राठोड, अक्षय व ज्ञानेश्वर जाधव (हिवरखेडा गौताळा), प्रणव सानप, वैष्णवी पवार (देवगाव रंगारी) आणि ममता मोरे यांचा समावेश होता. खरेदी-विक्री संघाचे संचालक आकाश बोलधने यांच्या हस्ते या सर्व गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. सोनू राठोड यांनी सांगितले की, बारावीत ९२ टक्के गुण मिळवूनही शिक्षणासाठी व नोकरीसाठी पैसे नसल्यामुळे अत्यंत जिद्दीने पोलिस दलाची वाट धरली. सीता नाईक तांड्यावरून पोलिस दलात जाणारी बंजारा समाजातील मी एकमेव मुलगी आहे. आता खात्यांतर्गत परीक्षा देऊन वरिष्ठ पदावर पोहोचण्याचे माझे ध्येय आहे. यावेळी बोलताना आकाश बोलधने म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड बुद्धिमत्ता आहे, पण योग्य संधीची कमतरता आहे. तरी वाड्या-तांड्यावरील ही मुले जिद्दीने ध्येय गाठत आहेत, हे विशेष. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किरण राठोड यांनी, सूत्रसंचालन विक्रम निळ यांनी केले, तर आभार अजय चव्हाण यांनी मानले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Source link
आई वडिलांच्या अफाट कष्टामुळे मिळाले यश- सोनू राठोड:ऊसतोड मजुराची लेक सोनू राठोड मुंबई पोलिस दलात