![]()
सराफ व्यावसायिकांचे 90 लाख 33 हजार रुपये किमतीचे सोने आणि दागिन्यांची 14 पार्सल घेऊन मुंबईला निघालेला कुरिअर कर्मचारी वाकड पुलाजवळ बसमधून उतरून फरार झाला आहे. ही घटना पुणे-मुंबई प्रवासात घडली. याप्रकरणी जितेंद्र ऋषिकेश सिंह (रा. लक्ष्मी अपार्टमेंट, राष्ट्रभूषण चौक, घोरपडी पेठ) यांनी खडक पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी विशाल सत्यपाल चौहान (वय 20, सध्या रा. मुंबई; मूळ रा. नरोरा, जि. एटा, उत्तर प्रदेश) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जितेंद्र सिंह यांचा ‘एसजीएलजेपी लॉजिस्टिक प्रा. लि.’ या नावाने कुरिअर व्यवसाय आहे. त्यांची कंपनी पुणे, कोल्हापूर, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे शाखांमार्फत ग्राहकांचे सोने आणि पैसे कुरिअरद्वारे पोहोचवण्याचे काम करते. विशाल चौहान हा कंपनीच्या मुंबई कार्यालयात कामाला होता आणि त्याला दरमहा 12 हजार 300 रुपये वेतन मिळत होते. 4 ऑगस्ट रोजी कोल्हापूरमधील सहा, पुण्यातील पाच तसेच जळगाव, जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रत्येकी एक अशी एकूण 14 पार्सल पुण्यात जमा झाली होती. या पार्सलमध्ये सोन्याची बिस्किटे आणि दागिने होते. चौहान 5 ऑगस्ट रोजी पहाटे साडेपाच वाजता स्वारगेट एसटी स्थानकावरून मंत्रालयाच्या बसने मुंबईला रवाना झाला. बस सकाळी नऊ वाजता मुंबईत पोहोचली, मात्र चौहान तेथे पोहोचला नाही. त्याचा फोनही बंद होता. बस वाहकाकडे चौकशी केली असता, तो वाकड पुलाजवळ उतरल्याचे समजले. या घटनेनंतर कंपनीने तात्काळ पोलिसांत धाव घेतली. सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्हाड या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
Source link
90 लाखांचे सोने घेऊन कुरिअर कर्मचारी फरार:पुणे-मुंबई प्रवासात वाकड पुलाजवळ बसमधून उतरून पसार