Headlines

Mahatma Phule Vichar Sahitya Sammelan 2026 in Pune



राष्ट्र सेवा दलाच्या पुढाकाराने राष्ट्रीय पातळीवरील महात्मा फुले विचार साहित्य संमेलन पुण्यात दि. 27, 28, 29 नोव्हेंबर 2026 रोजी आयोजित करण्यात आले आहे. हा तीन दिवसीय महोत्सव विचार, साहित्य आणि संस्कृतीचा संगम असेल.

.

या संमेलनात देशभरातील विचारक, भाष्यकार, अभ्यासक, संशोधक, लेखक, कवी, संपादक, पत्रकार, प्राध्यापक, कलाकार, कृतीवंत, तसेच ‘जेन झी’ आंदोलनातील विविध विद्यापीठांचे विद्यार्थी सहभागी होतील. राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष राजा कांदळकर यांनी ही माहिती दिली.

महात्मा फुले जन्म द्विशताब्दी, महाड चवदार तळ्याची शताब्दी, मनुस्मृती दहन शताब्दी आणि राजर्षी शाहू महाराजांनी दिलेल्या आरक्षणाची 125 वर्षे या निमित्ताने हे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्र सेवा दल वर्षभर ‘विषमता निर्मूलन निर्धार वर्ष’ देशभर साजरे करत आहे, त्याचाच एक भाग म्हणून हा विचार, साहित्य, संस्कृती महोत्सव होत आहे.

संमेलनात पुस्तक प्रदर्शन, ‘जेन झी’ आंदोलनातील तरुणांच्या पोस्टरचे प्रदर्शन, तरुण व्यंगचित्रकारांच्या व्यंगचित्रांचे लाईव्ह प्रदर्शन, संविधान दालन, विविध विषयांवर टॉक शो, मुलाखती, व्याख्याने, नाटक, गाणी आणि कविता सादर होतील. ‘लेखक, कवी आपल्या भेटीला’ हा विशेष उपक्रम प्रकाशकांच्या पुस्तक दालनात लक्ष वेधून घेईल.

या संमेलनासाठी एक संमेलन समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यात लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे, राजन गवस, प्रवीण बांदेकर, नीरज हातेकर, अलीम वकील, अरुण म्हात्रे, ज्ञानेश महाराव, निशिकांत कोलगे, आशालता कांबळे, विनोद शिरसाठ, लक्ष्मण यादव, हुबनाथ पांडे, प्रकाश दुबे, प्रदीप दाते, किशोर ढमाले, सुबोध मोरे, प्रतिमा परदेशी, सोमनाथ रोडे, सरफराज अहमद, सूरज येंगडे, जयवंत पाटील, अजित शिंदे आणि राजा कांदळकर यांचा समावेश आहे. कपिल पाटील, सुभाष वारे, अंजली आंबेडकर, अभिजित वैद्य आणि नितीन वैद्य हे विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहतील. पुण्यातील संमेलन स्थळाची माहिती लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.

संमेलन कसे असावे याबद्दल काही सूचना असल्यास, पुढील मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप करून कळवावे, असे आवाहन करण्यात आले आहे. संमेलनात सहभाग नोंदवण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी रोहित ढाले (9869819878), सागर भालेराव (9967055630), प्रशांत इंगळे (9420889862) आणि अभिजित आंब्रे (8605400373) या दूरध्वनी क्रमांकांवर संपर्क साधता येईल.



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *