![]()
14 वर्षांच्या शाळकरी मुलीची आपबिती तिच्याच शब्दांत; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल
रोब्लॉक्स या ऑनलाइन गेमच्या माध्यमातून १४ वर्षांच्या एका मुलीच्या मोबाइलद्वारे घरातील सर्व खोल्यांचे मॅपिंग केले. नंतर तिच्याशी चॅटिंगद्वारे तिच्याशी संपर्क साधून बँक खात्यातून यूपीआयद्वारे पैसे काढण्याची धमकी देत, नग्न छायाचित्र पाठवण्यास भाग पाडले.
.
त्यानंतर मुंबईतील एका आरोपींनी थेट आई-वडिलांशी संपर्क साधून आणि अश्लील फोटोंचा वापर करून तिच्या कुटुंबाला मानसिक त्रास दिल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात आर्यन (रा. मुंबई असल्याचा संशय) या गुन्हेगाराविरुद्ध पोस्को आणि माहिती तंत्रज्ञान कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.
१४ वर्षांच्या शाळकरी मुलीची आपबिती तिच्याच शब्दांत; मुकुंदवाडीत गुन्हा दाखल
नो व्हेंबर २०२५ चा तो दिवस मी कधीच विसरू शकत नाही. मी घरात वाय-फाय कनेक्ट करून मोबाइलवर रोब्लॉक्स हा ऑनलाइन गेम खेळत होते. खेळता खेळता आर्यन आत्रे नावाच्या एका प्रोफाइलशी माझी ओळख झाली. गेममध्ये ट्विन ट्रिक्सने एकत्र कसे खेळायचे हे सांगत त्याने माझा विश्वास संपादन केला. पण मला काय ठाऊक, या ट्रिक्सच्या नादात माझ्या मोबाइलचा संपूर्ण ॲक्सेस त्याच्या हाती गेला होता. हळूहळू त्याने मला स्नॅपचॅटवर चॅटिंग करायला लावले आणि नंतर व्हॉट्सॲप सुरू करण्यास सांगितले. मी व्हॉट्सॲप वापरण्यास नकार दिला, तेव्हा त्याने मला पहिली धमकी दिली. ‘जर तू व्हॉट्सॲपवर बोलली नाहीस, तर तुझ्या आई-वडिलांच्या फोनपेतील सगळे पैसे उडवून टाकेन’. मी प्रचंड घाबरले. आई-वडिलांचे पैसे जातील या भीतीने मी त्याच्या सांगण्यावरून व्हॉट्सॲप सुरू केले.
…अन् त्यांनी न्यूड फोटो मागवले
मार्च २०२६ मध्ये ब्लॅकमेलिंगचा खरा खेळ सुरू झाला. त्याने मला माझे न्यूड फोटो पाठवायला सांगितले. मी पुन्हा नकार दिला, पण त्याने पुन्हा फोनपेची धमकी दिली. भीतीमुळे मी माझे फोटो त्याला पाठवले. जुलै २०२६ मध्ये त्याने मला इन्स्टाग्रामवर ४ वेगळे बनावट आयडी बनवून दिले आणि त्यावरून स्वतःच्या आयडीवर चॅट करायला लावले. तोच आयांश आणि मुझम्मिल अशा वेगवेगळ्या नावाने मला धमक्या देऊ लागला. ५ ऑगस्ट २०२६ ला त्याने सर्व सीमा ओलांडल्या. त्याने थेट माझ्या आईच्या मोबाइलवर फोन केला आणि बनाव रचला, तुमची मुलगी माझ्या भावाशी बोलते, त्यामुळे माझा भाऊ आर्यन आता आत्महत्या करत आहे. एवढ्यावरच न थांबता त्याने चॅटिंगचे स्क्रीनशॉट्स आई-वडिलांना पाठवले आणि वडिलांना फोन करून मानसिक त्रास दिला. शेवटी मी धीर एकवटला अन् रडत रडत आई-वडिलांना सर्व प्रकार सांगितला. आम्ही तात्काळ मुकुंदवाडी पोलिस ठाणे गाठले.
ट्विन हॅकिंग, फोन क्लोनिंग म्हणजे काय?
ऑनलाइन गेममध्ये ट्विन किंवा स्क्रीन शेअरिंग ट्रिक्सचा बहाणा करून सायबर भामटे युझरच्या मोबाइलमध्ये मालवेअर किंवा रिमोट ॲक्सेस ॲप इन्स्टॉल करतात. याला फोन क्लोनिंग म्हणतात. यामुळे पीडित व्यक्तीच्या मोबाइलमधील सर्व मेसेजेस, फोटो, फोनपे/गुगलपेचे पासवर्ड आणि सोशल मीडिया आयडींचा ताबा थेट गुन्हेगाराच्या हाती जातो.