![]()
श्री चक्रधरांच्या साडेआठशे वर्षांपूर्वीच्या वास्तव्याने पावन झालेल्या कन्नड शहरात त्यांच्या शिकवणुकीची आजच्या काळात नितांत गरज आहे. सप्त व्यसनांपासून दूर राहून मानवता धर्माची उपासना करणे हीच खरी स्वामींची महती जोपासना ठरेल, असे प्रतिपादन महंत कन्नडकर
.
बाराव्या शतकात श्री चक्रधर स्वामींनी कन्नड येथे वास्तव्य केले होते. खुलताबाद तालुक्यातील इंदापूर, लोणी आणि कन्नड तालुक्यातील कानडगाव येथून भव्य पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्र्यांचा संगम कन्नड येथील श्री क्षेत्र दत्त मंदिरात झाला. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात महंत कन्नडकर महाराज सदभक्तांशी संवाद साधत होते.
या वेळी बोलताना ते म्हणाले की, श्री चक्रधर स्वामींनी आपल्या कन्नड वास्तव्यादरम्यान वाड्याच्या बाहेरील द्राक्षाच्या घडाला स्पर्श करून उपस्थितांना अमूल्य उपदेश दिला होता, ज्यामुळे या स्थळाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. त्या काळात हे शहर कनरडे म्हणून ओळखले जाई.
स्वामींनी येथे मद्यपान, अफू, गांजा यांसारखी व्यसने, मांसाहार, परस्त्री गमन, शिकार आणि चोरी या सप्त व्यसनांपासून अलिप्त राहण्याचा संदेश दिला. तसेच वृक्षवल्ली व प्राणिमात्रांची हिंसा न करता सर्वधर्मसमभाव व मानवी धर्म जोपासण्याची मौलिक शिकवण दिली. कन्नड येथील उपदेशानंतर स्वामी गौताळा अभयारण्यमार्गे सायगव्हाण आणि तिथून बुलडाणा जिल्ह्यातील जाळीच्या देव भागाकडे प्रस्थान करते झाले.
कार्यक्रमात महंत तळेकर आणि महंत देभेगावकर यांनीही उपस्थित संतांना व भक्तांना मार्गदर्शन केले. या वेळी सुभाष निकम नादरपूरकर, सदभक्त संतोष जाधव, शिवा पवार, विशाल पाटील, गुलाब पाटील, अक्कू पवार, सुदाम नलावडे, आकाश बोलधने, सामाजिक कार्यकर्ते मनोज पवार, गोकुळ राठोड आणि अतुल सुभाष निकम यांच्यासह मोठ्या संख्येने भाविक व नागरिक उपस्थित होते. श्री क्षेत्र दत्त मंदिरातून निघालेली ही पदयात्रा त्यानंतर सायगव्हाणमार्गे जळगाव जिल्ह्यातील श्री क्षेत्र कनाशी (ता. चाळीसगाव) येथे मार्गस्थ झाली. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार सुभाष निकम यांनी मानले.