![]()
जुने शहरातील ३२२ वर्षे पुरातन श्री विठ्ठल मंदिरात रविवारी श्री विठ्ठल-रुक्मिणी मूर्ती स्थापनेचा ३२२ वा वर्धापन दिन व श्री विठ्ठल मंदिर एकादशी महाआरती मंडळाचा २८ व्या वर्धापन दिन सोहळा पार पडला. यानिमित्त धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
.
जुने शहरातील ३२२ वर्ष पुरातन श्री विठ्ठल मंदिरात दर आषाढी एकादशीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करण्यात येते. तसेच व कार्तिक महिन्यात काकड आरतीही होते. दरम्यान रविवारी मूर्ती स्थापना वर्धापन दिन सोहळा पार पडला. हा धार्मिक सोहळा श्री विठ्ठल मंदिर अखंड हरिनाम सप्ताह मंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आला. पूजन-अभिषेकाने प्रारंभ झाला. सकाळी श्री विठ्ठल-रुक्मिणीचे विधिवत पूजन व अभिषेक करण्यात आला. जिल्हा व सत्र न्यायाधीश तेजवंत सिंह संधू व त्यांच्या पत्नी गुरप्रीत कौर यांच्या हस्ते महाभिषेक करण्यात आला. भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विठ्ठल-रुक्मिणीच्या चरणी भक्तिभाव अर्पण करण्यासह हरिनामाचा गजर आणि महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी उपस्थिती लावली. विठ्ठलभक्ती, सामूहिक नामस्मरण आणि धार्मिक परंपरेचे जतन या माध्यमातून वर्धापन दिन सोहळ्याला आध्यात्मिक अधिष्ठान लाभले. सोहळ्यासाठी सर्वसेवाधिकारी कृष्णा शर्मा, व्यवस्थापक रमेश अलकरी, प्रवीण वाणी, विकास वाणी, चंद्रकांत चाळसे, श्याम घाटे, प्रमोद अलकरी, ॲड. अजिंक्य अलकरी आदींनी परिश्रम घेतले.
सुंदरकांड पठणातून रामनामाचा गजर सकाळी १० वाजता श्री विठ्ठल मंदिर सुंदरकांड मंडळाच्या वतीने सुंदरकांड पठण करण्यात आले. सामूहिक पठणामुळे परिसरात आध्यात्मिक वातावरण निर्माण झाले. महिला भजनी मंडळाने भक्तिगीतांमधून आपली सेवा अर्पण केली. दुपारी ३ ते ५ या वेळेत श्री विठ्ठल मंदिर महिला भजनी मंडळाच्या वतीने भजनाचा कार्यक्रम झाला. प्रमुख सुनंदा देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली भाविकांनी विठ्ठलनामाचा जागर केला.