![]()
शेत रस्त्यांची कामे निकृष्ट दर्जाची असून, रोजगार हमी योजनेच्या कामात घोळ झाल्याचा आरोप करत सोमवारी ग्रामस्थांनी पंचायत समितीपुढे उपोषण केले. याबाबत जिल्हाधिकरी, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसह तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.
.
शेतकऱ्यांना शेतात ये- जा करण्यासाठी रस्त्याची समस्या भेडसावते. शेतकऱ्यांना शेतमाल, अवजारे, जनावरे, वाहने शेतात ने- आण करणे सोईचे होत नाही. शेतरस्त्यांवरून वादही होतात. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यातील शेतरस्ते अडथळामुक्त व्हावेत यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत कालबद्ध कार्यक्रम निश्चित करून देण्यात आला होता. त्यानुसार कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. दरम्यान लाखोंडा परिसरातील रस्ते, वृक्षारोपण, मजूर हजेरीपासून घंटागाडी खरेदीपर्यंत ११ मुद्द्यांवर चौकशीची मागणी सामाजिक कार्यकर्ते गणेश घावट यांनी निवेदनात केली. ग्रामपंचायत परिसरात रोजगार हमी योजना तसेच विविध विकासकामांमध्ये अनियमितता व गैरव्यवहार झाल्याचा आरोप त्यांनी केला. पाणंद रस्ता, वृक्षारोपण, रोजगार हमीच्या मस्टरवरील हजेरी, मजुरांची छायाचित्रे, शाळेच्या संरक्षक भिंतीचे काम, जमिनीची मोजणी, तलावाचे पाणी, घंटागाडी खरेदी आदी मुद्यांच्या चौकशी करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. मस्टरवर प्रश्नचिन्ह : रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांच्या चौकशीची मागणी त्यांनी केली आहे. मस्टरवर खोट्या व बनावट सह्या करण्यात आल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित तक्रारदारांच्या हस्ताक्षराची तज्ज्ञांकडून तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. रोजगार हमी योजनेवरील ऑनलाइन नोंदीतील मजूर आणि कामाच्या छायाचित्रांमध्ये दिसणारे मजूर यांच्यात तफावत असल्याचा आरोप आहे. १ सप्टेंबर २०२३ पासूनच्या नोंदींची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. २६ एप्रिल २०२४ रोजी नवरेखेवाडी येथे हजेरी लावून देयकाची रक्कम गैरकायदेशीररीत्या काढण्यात आल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. या प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी आहे.
खरेदीत गैरव्यवहाराचा संशय : घंटागाडी खरेदी केल्याचे दाखवण्यात आले असून, मात्र प्रत्यक्षात ग्रामपंचायतीला घंटागाडी उपलब्ध नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी आहे. पाणंद रस्त्याची चौकशी करणाऱ्या संबंधित अभियंत्यांनी केलेली चौकशी मान्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे ही चौकशी वरिष्ठ स्तरावरून करून संबंधित अधिकाऱ्यांची तालुक्याबाहेर बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे.
पाणंद रस्त्याच्या कामाच्या दर्जावर प्रश्नचिन्ह लाखोंडा बुद्रुक ते घुसरवाडी या गाव रस्त्यावरील पाणंद शेतरस्त्याचे काम अंदाजपत्रकानुसार न करता निकृष्ट दर्जाचे करण्यात आल्याचा आरोप निवेदनात आहे. संबंधित कामाचे देयक अदा करू नये तसेच संपूर्ण कामाची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. वृक्षारोपण संवर्धनाच्या कामामध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्रत्यक्ष काम आणि कागदोपत्री नोंदी यांची पडताळणी करण्याची मागणी आहे.