Headlines

मंत्र्यांच्या घरात साप-विंचू सोडा, मग मृत्यूचं भय कळेल!:गडचिरोलीतील मृत्यूंवरून संजय राऊतांचा संताप, म्हणाले- अमित शहांना तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल




गडचिरोली जिल्ह्यात सर्पदंशामुळे तीन आदिवासी विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या अत्यंत धक्कादायक घटनेवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. “आदिवासींची मुले सर्पदंशाने आणि विंचू चावल्याने मरत आहेत, तर दुसरीकडे हजारो आदिवासी खनिज कंपन्यांच्या गाड्यांखाली चिरडून मरत आहेत. हे सरकार केवळ आदिवासींच्या जीवावर उठले आहे,” अशी खरमरीत टीका राऊत यांनी केली. “आदिवासी बांधवांनी आता जंगलातले साप आणि विंचू पकडून या मंत्र्यांच्या घरात आणि मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्यावर सोडावेत, तेव्हाच यांना मृत्यूचे भय काय असते ते समजेल,” असे आक्रमक विधान संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत केले. आदिवासी आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांचे बळी, निधी कोण खातोय? गडचिरोलीमधील आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींच्या झालेल्या मृत्यूबद्दल संताप व्यक्त करताना राऊत म्हणाले, “शासकीय आश्रमशाळांची अवस्था अतिशय भयंकर आहे. मुलींना झोपायला साधे बेड नाहीत, त्यामुळे त्या खाली झोपल्या आणि त्यांना सर्पदंश झाला. या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आणि मुख्यमंत्री काय करत आहेत? आदिवासींच्या विकासासाठी आलेला निधी नेमका कुठे जातोय आणि कोण खातोय? आठवड्यातून दोन-तीन वेळा अशा घटना घडत आहेत, मात्र त्या रेकॉर्डवर येऊ दिल्या जात नाहीत.” खनिज कंपन्यांच्या ट्रकखाली दीड वर्षांत 150 आदिवासींचे बळी संजय राऊत यांनी गडचिरोलीमधील खाण उद्योगांवरही गंभीर आरोप केले. “गडचिरोलीत तुम्ही स्टील सिटी उभारणार आहात, पण तिथे खाण मालकांच्या हजारो गाड्यांखाली चिरडून गेल्या दीड वर्षांत 150 हून अधिक आदिवासींचे बळी गेले आहेत. या मृत्यूंची कुठेही नोंद होत नाही. जर एखादा आदिवासी ट्रकखाली चिरडून मेला, तर खाण मालकांना नुकसान भरपाई द्यावी लागेल म्हणून पाच मिनिटांत त्याची बॉडी गायब केली जाते आणि पाण्याचे फवारे मारून रक्त साफ केले जाते. तिथले कलेक्टर, पोलीस आणि प्रशासन या खाण मालकांकडून महिन्याला कोटींच्या घरात हप्ते खात आहेत.” नक्षलवाद कोणासाठी संपवला? उद्योगपतींसाठी की आदिवासींसाठी? नक्षलवादावर बोलताना राऊत म्हणाले, “नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस विकासाच्या मोठ्या मोठ्या गप्पा मारत आहेत आणि आम्ही नक्षलवाद संपवला असे सांगत आहेत. पण नक्षलवाद कोणासाठी संपवला? आदिवासींसाठी की उद्योगपतींसाठी? उद्योगपतींचे आणि भाजपच्या देणगीदारांचे संरक्षण करण्यासाठी तुम्ही नक्षलवाद संपवण्याची भाषा करत आहात. आदिवासींच्या नद्या, डोंगर आणि जंगले उद्ध्वस्त करायचा परवाना तुम्ही या उद्योगपतींना दिला आहे.” आदित्य ठाकरेंसोबत चर्चा करणार या गंभीर विषयावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे राऊत यांनी सांगितले. “आदित्य ठाकरे पर्यावरण आणि आदिवासींच्या प्रश्नांवर अत्यंत गंभीर आहेत. या संदर्भात आम्ही ग्रीन ट्रिब्युनल आणि केंद्राकडेही हा विषय मांडलेला आहे. मुंबईत गेल्यावर मी आदित्य ठाकरेंसोबत याविषयी नक्की चर्चा करणार आहे.” आदिवासी मंत्र्यांनी राजीनामे द्यावेत, हा निव्वळ शो बंद करा “आदिवासी विकास मंत्री धर्मराव बाबा आत्राम केवळ पॅलेसमध्ये राहतात. आदिवासींच्या नावाने हे लोक केवळ मनोरंजन करून घेत आहेत. आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्याचा नुसता ‘शो’ सुरू आहे. तुम्हाला कसला आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करायचाय? अगोदर महाराष्ट्रातील आदिवासींना जगवा. या सर्व संबंधित मंत्र्यांनी तातडीने राजीनामे दिले पाहिजेत.” 350 हून अधिक कंपन्या राज्याबाहेर, उद्योगमंत्री करतात तरी काय? महाराष्ट्रातील उद्योग आणि गुंतवणुकीवरही राऊत यांनी सरकारला धारेवर धरले. “राज्यातून साडेतीनशेहून अधिक कंपन्या परदेशात किंवा इतर राज्यांत गेल्या आहेत. देवेंद्र फडणवीस सांगतायत की गुंतवणूक येतेय; मग राज्यात रोजगार कुठे आहे? सरकारच्या धोरणाला आणि खंडणीखोरीला कंटाळून कंपन्या राज्याबाहेर जात आहेत. आमचे उद्योगमंत्री उदय सामंत नेमके काय करत आहेत? ते कुणाचे उद्योगमंत्री आहेत? एमआयडीसीच्या (MIDC) जमिनी कशा विकल्या जात आहेत, याचा सगळा हिशोब माझ्याकडे पक्का आहे.” अमित शहा उपकार करत नाहीत; तरुणांच्या रोषाला सामोरे जावेच लागेल संसदेतील जंतर-मंतरवरील लाठीचार्जच्या मुद्यावर राऊत यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना आव्हान दिले. “अमित शाह संसदेत बोलायला तयार झाले आहेत, म्हणजे ते देशावर आणि लोकशाहीवर उपकार करत नाहीत. जंतर-मंतरवर शांततेत आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज केला गेला, त्यांच्यावर पाणी मारले गेले. या क्रूर कारवाईची जबाबदारी घेऊन अमित शहा यांनी राजीनामा द्यायला हवा. देशभरातील तरुण आता रस्त्यावर उतरत आहेत. तरुणांचा हा रोष सरकारला घरी पाठवल्याशिवाय राहणार नाही.” हेही वाचा… 13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:कोकण-घाटमाथ्यांवर यलो अलर्ट, चीनच्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्यापूर्वीच राज्यात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत असून, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी



Source link

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *