![]()
कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण मार्गावरील विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी बस सेवा का सुरु नाही, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी घेणार का अशा शब्दात वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी ता. 10 कळमनुरी बस आगारातील अधिकाऱ्यांना जाब विचारून बससेवा सुरु करण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली आहे. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास आगारासह ग्रामसडक योजनेच्या कार्यालयात ठाण मांडण्याचा इशारा दिला आहे. कळमनुरी तालुक्यातील शेनोडी, मोरगव्हाण परिसरातील गावांमधून मोठ्या संख्येने विद्यार्थी शिक्षणासाठी कळमनुरी शहरात येतात. मात्र या रस्त्यावर खड्डे असल्याचे कारण पुढे करून कळमनुरी बस आगाराने या मार्गावर बससेवा सुरु केली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना कधी पायी तर कधी खाजगी प्रवासी वाहनाने यावे लागत आहे. खाजगी प्रवासी वाहनांमुळे विद्यार्थ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. दरम्यान, सोमवारी ता. 10 विद्यार्थ्यांनी वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी राजू कांबळे यांच्याशी संपर्क साधून वाहतुकीची समस्या मांडली. त्यानंतर कांबळे यांच्यासह युवा तालुकाध्यक्ष मोहमद अस्लम, दिनेश पाईकराव, सुशील वाढवे, समाधान पाईकराव यांनी कळमनुरी आगारात जाऊन अधिकाऱ्यांना धारेवर धरले. बससेवा का सुरु केली नाही अशी विचारणा केली असता त्या मार्गावर खड्डे आहेत तसेच चालक देखील कमी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या पदाधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच खडसावले. वाहतुक व्यवस्था नसल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसान होत असल्याचे सांगत पुढील दोन दिवसांत बससेवा सुरु करा अशी मागणी केली. या मुदतीत बससेवा सुरु न झाल्यास कळमनुरी आगार व खड्डे बुजविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजना कार्यालयात विद्यार्थ्यांसह ठाण मांडण्याचा इशारा दिला आहे.
Source link
शेनोडी-मोरगव्हाण मार्गावर दोन दिवसांत बससेवा सुरू करा:अन्यथा वंचित बहुजन आघाडीचा आंदोलनाचा इशारा