![]()
पावसाळा सुरू होताच येथील रस्त्यांच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गावातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी व चिखल साचल्याने नागरिकांसह विद्यार्थ्यांना ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विद्यार्थ्यांनाही या चिखलातूनच शाळेत प्रवेश घ्यावा लागतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या कारभाराबद्दलही प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. विशेषतः जिल्हा परिषद मुलांच्या शाळेजवळच मोठा खड्डा निर्माण होऊन त्यात पाणी साचले आहे. याच मार्गाने दररोज लहान मुले ये-जा करीत असल्याने घसरून पडण्याची किंवा अपघात होण्याची भीती आहे. त्यामुळे पालकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. दरवर्षी पावसाळ्यात अशीच परिस्थिती निर्माण होत असताना नाल्यांची साफसफाई, पाण्याचा निचरा आणि रस्त्यांची दुरुस्ती याबाबत ग्रामपंचायतीकडून ठोस उपाययोजना का केल्या जात नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित होत आहे. दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने शाळेजवळील खड्डा बुजवून पाण्याचा निचरा करावा, अशी मागणी होत आहे. कन्या शाळेत पिण्याचे पाणी नाही जि.प. प्राथमिक कन्या शाळेत विद्यार्थिनींसाठी शुद्ध पिण्याच्या पाण्याची सुविधा नसल्याने पालकांनी नवीन वॉटर प्युरीफायर व वॉटर कुलर तातडीने बसविण्याची मागणी केली आहे.याबाबत मुख्याध्यापिकांमार्फ त ग्रामपंचायतीकडे निवेदन सादर करण्यात आले आहे.जुनी यंत्रणा कालबाह्य झाल्यामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्याच्यादृष्टीने नवीन यंत्रणा बसवून शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी पालकांची मागणी आहे. दरम्यान मुख्याध्यापिका विजया झाडे यांनीही ही सुविधा अत्यावश्यक असल्याचे सांगितले, तर पालक प्रतिनिधी पंकज दरोळी यांनी ग्रामपंचायतीने तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Source link
शाळेजवळील रस्त्यावर साचले चिखलाचे तळे:ग्रामपंचायतीच्या कारभारामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आला ऐरणीवर