![]()
महाराष्ट्रात येत्या दोन दिवसांत श्रावण महिन्याची सुरुवात होत असून, त्यापूर्वीच राज्यात हवामानाचे विविध रंग पाहायला मिळत आहेत. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराकडून येणाऱ्या परस्परविरोधी वाऱ्यांमुळे मध्य भारतात हवेचे जोडक्षेत्र निर्माण झाले आहे. याचा थेट परिणाम सह्याद्रीच्या पर्वतरांगांवर दिसून येत असून, हवामान विभागाने रायगड, रत्नागिरी, पुणे आणि सातारा जिल्ह्यांतील घाटमाथ्यांवर मुसळधार पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. दुसरीकडे, प्रशांत महासागरात आलेल्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळामुळे गेल्या काही दिवसांत मान्सूनचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, येत्या २४ तासांत बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असून, १३ ऑगस्टपासून राज्यात मान्सून पुन्हा एकदा पूर्ण क्षमतेने सक्रिय होण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. घाटांमध्ये मुसळधार, तर उर्वरित महाराष्ट्रात श्रावणसरी चीनच्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात पावसाने घेतलेल्या विश्रांतीमागे आंतरराष्ट्रीय हवामान घडामोडी कारणीभूत ठरल्या आहेत. चीनच्या किनारपट्टीवर धडकलेल्या ‘डॉल्फिन’ चक्रीवादळामुळे प्रशांत महासागरात तीव्र हालचाली सुरू होत्या. यामुळे भारतीय उपखंडाकडे येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांची दिशा बदलली आणि बंगालच्या उपसागरातील मान्सूनच्या ढगांचे प्रमाण घटले. परिणामी, भारतातील पावसाचा जोर तात्पुरता मंदावला होता. आता हे वादळ शमल्यानंतर बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार होत असून, मान्सूनचा पुढील टप्पा अधिक जोरदार असणार आहे. मुंबई, ठाणे आणि उपनगरांत तुफान हजेरी; वाहतूक मंदावली मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरांत आज सकाळपासूनच जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाणे, नवी मुंबई, मुंब्रा, महापे आणि ऐरोली परिसरात पहाटेपासूनच संततधार पाऊस सुरू आहे. महापे आणि ऐरोलीतील सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे. पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गावर वाहनांचा वेग मंदावला आहे. ठाणे-बेलापूर मार्गावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने आणि सायन-बेलापूर महामार्गावर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक धीम्या गतीने सुरू आहे. शेतकऱ्यांना दिलासा आणि कृषी तज्ज्ञांचा सल्ला श्रावणातील हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा फायदा पिकांना होत आहे. ज्या भागात अतिवृष्टीमुळे शेतात पाणी साचले होते, तिथे आता पाणी ओसरल्याने शेतीकामांना वेग आला आहे. कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, ज्या भागात पावसाने सध्या उघडीप दिली आहे, तेथील शेतकऱ्यांनी पिकांची कोळपणी आणि तणनाशक फवारणीची प्रलंबित कामे तातडीने उरकून घ्यावीत. संभाव्य धोके आणि हवामान विभागाचा इशारा हवामान विभागाच्या ‘इम्पॅक्ट-बेस्ड फोरकास्ट’नुसार पुढील काही दिवसांत ढगाळ वातावरण, वादळी वारे आणि जोरदार पावसाची शक्यता आहे. यवतमाळसह काही जिल्ह्यांत स्थानिक पातळीवर पाणी साचणे, जुन्या किंवा कमकुवत इमारतींचे नुकसान होणे आणि झाडे उन्मळून पडण्याचा धोका वर्तवण्यात आला आहे. घाट परिसरात प्रवास करताना भूस्खलन आणि दरडी कोसळण्याचा धोका वाढू शकतो. त्यामुळे पर्यटकांनी व नागरिकांनी प्रवास करताना सतर्क राहावे आणि प्रादेशिक हवामान केंद्राच्या सूचनांचे पालन करावे. हेही वाचा… पिंपरी-चिंचवडमध्ये 4 वर्षांच्या चिमुकलीवर 7 भटक्या कुत्र्यांचा हल्ला: डोक्यावर पडले 80 हून अधिक टाके, चिखलीतील भयानक घटना CCTV मध्ये कैद पिंपरी-चिंचवड शहरातील चिखली परिसरात सात भटक्या कुत्र्यांनी एका चार वर्षांच्या मुलीवर हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. या घटनेत मुलीच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तिच्या डोक्यावर 80 हून अधिक टाके पडले आहेत. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज मंगळवारी समोर आले आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
13 ऑगस्टपासून महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर वाढणार:कोकण-घाटमाथ्यांवर यलो अलर्ट, चीनच्या 'डॉल्फिन' चक्रीवादळाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव