![]()
भाऊ कितीही दूर असला, तरी बहिणीच्या प्रेमाला अंतराची सीमा नसते. रक्षाबंधनाच्या दिवशी भावाच्या मनगटावर राखी बांधण्याची ओढ प्रत्येक बहिणीला असते. मात्र प्रत्यक्ष भेट शक्य नसलेल्या बहिणींची हीच भावनिक ओढ आता टपाल विभाग पूर्ण करणार आहे. ‘राखी मेल सर्व्हिस
.
यंदा २८ ऑगस्ट २०२६ रोजी रक्षाबंधन साजरे होणार असून, त्यासाठी अहिल्यानगर टपाल विभागाने विशेष तयारी केली आहे. १२ ऑगस्टपासून एका बहिणीला पाच पाकिटांपर्यंत स्पीड पोस्ट करता येणार आहे. देशातील कोणत्याही राज्यात राखी पाठविण्यासोबतच परदेशातील भावंडांपर्यंतही राखी पोहोचवण्याची सुविधा उपलब्ध आहे. रक्षाबंधन पावसाळ्यात येत असल्याने राखी खराब होण्याची शक्यता लक्षात घेऊन टपाल विभागाने विशेष वॉटरप्रूफ राखी पाकिटांची व्यवस्था केली आहे. त्यामुळे पावसातही बहिणीची राखी सुरक्षितपणे भावापर्यंत पोहोचणार आहे. राखीच्या माध्यमातून केवळ एक धागा नाही, तर बहिणीचे प्रेम, भावाविषयीची माया आणि नात्याची ऊब पाठवली जाते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या काळातील गर्दी टाळण्यासाठी नागरिकांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता राखीचे बुकिंग लवकर करावे. देश-विदेशातील प्रिय भावंडांपर्यंत प्रेमाची राखी वेळेत पोहोचविण्यासाठी टपाल विभागाच्या या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ अधीक्षक डाकघर, अहिल्यानगर विभाग यांनी केले आहे.
३६२ टपाल कार्यालयांत राखी बुकिंग सुविधा अहिल्यानगर विभागातील १ मुख्य टपाल कार्यालय, ४७ उपटपाल कार्यालये आणि ३१४ शाखा टपाल कार्यालये, अशा एकूण ३६२ कार्यालयांमध्ये राखी बुकिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे गावापासून शहरापर्यंत बहिणींना आपल्या जवळच्या टपाल कार्यालयातून राखी पाठविता येणार आहे.