![]()
हिंगोली शहरातील बसस्थानका समोरील एनटीसी कमानीजवळ शहर पोलिसांच्या पथकाने एका व्यक्तीच्या संशयावरून त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यातून 8 किलो 135 ग्राम गांजा जप्त केला आहे. या प्रकरणी मंगळवारी ता. 11 सकाळी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे हिंगोली शहरासह जिल्हाभरातील अवैध व्यवसायाचे उच्चाटन करण्यासाठी पोलिस दलाने कंबर कसली आहे. त्यासाठी पोलिस अधिक्षक श्रेणिक लोढा, अप्पर पोलिस अधिक्षक कमलेश मीना, गुन्हे शाखेचे निरीक्षक मोहन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली 13 पोलिस ठाण्यांची पथके कार्यरत ठेवण्यात आली असून त्या सोबत स्थानिक गुन्हे शाखेची चार पथके स्थापन केली आहेत. यापथकाकडून जिल्हाभरात अवैध व्यवसायवर छापे टाकले जात आहेत. दरम्यान, हिंगोली शहरातील बसस्थानकाच्या समोरील एनटीसी भागातील कमानीजवळ एका व्यक्तीजवळ गांजा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, उपनिरीक्षक युवराज वाघमारे, जमादार शेख मोहसीन, गणेश लेकुळे, दिलीप लेकुळे, सुनील अंभोरे, अशोक धामणे यांच्या पथकाने मंगळवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास एनटीसी कमानीजवळ जाऊन तेथे उभा असलेल्या मौलाखान पठाण (रा. मस्तानशहा नगर, हिंगोली) याच्या जवळील बॅगची तपासणी केली. या बॅगमध्ये गांजा असल्याचे दिसून आले. पोलिसांनी बॅगमधून 8 किलो 135 ग्राम गांजा व एक मोबाईल असा सुमारे 2.15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी उपनिरीक्षक युवराज वाघमारे यांच्या तक्रारीवरून हिंगोली शहर पोलिस ठाण्यात मौलाखान पठाण याच्या विरुध्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून पोलिस निरीक्षक देवेंद्रसिंह ठाकुर, सहाय्यक पोलिस निरीक्षक आनंद बनसोडे पुढील तपास करीत आहेत.
Source link
हिंगोलीत पहाटे 8 किलो गांजा पकडला:सलग दुसऱ्या दिवशी कारवाई, एक जण ताब्यात