![]()
पैठण शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुरळीत व नियमित ठेवण्यासाठी नगर परिषद प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर नगराध्यक्षा विद्याताई भूषण कावसानकर यांनी सोमवारी जायकवाडी येथील पंपहाऊसला प्रत्यक्ष भेट देऊन तेथील तांत्रिक व्यवस्थेची पाहणी केली. जायकवाडी पंपहाऊस ही पैठण शहराच्या पाणीपुरवठ्याची मुख्य जीवन वाहिनी आहे. नगराध्यक्षा कावसानकर यांनी दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या मोटारीच्या कामाचा सविस्तर आढावा घेतला. तसेच काम पूर्ण होण्यास लागणारा कालावधी आणि पाणीपुरवठ्यावर होणारा संभाव्य परिणाम याबाबत संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. शहरातील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी कोणतीही अडचण भासू नये, यासाठी मोटार दुरुस्तीचे काम तातडीने, दर्जेदार आणि सुरक्षित पद्धतीने पूर्ण करावे, अशा कडक सूचना नगराध्यक्षांनी दिल्या. दुरुस्तीनंतर आवश्यक तांत्रिक चाचण्या घेऊनच मोटार पुन्हा पाणीपुरवठा व्यवस्थेत कार्यान्वित करावी, असेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे यांनी सांगितले की, शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता नगर परिषदेच्या वतीने पाणीपुरवठा यंत्रणा अधिक सक्षम करण्यावर भर दिला जात आहे. या पाहणीदरम्यान पाणीपुरवठा अभियंता सौरभ हलमारे, किसन नवगिरे यांच्यासह विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
Source link
जायकवाडी पंपहाऊसची नगराध्यक्षांकडून पाहणी:मोटार दुरुस्तीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश