![]()
कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत पावनगाव ते भरतवाडा वाय-पॉईंट दरम्यान बुधवारी सकाळी भीषण अपघात झाला. मित्राचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघालेल्या तीन अल्पवयीन मित्रांच्या कारने उभ्या ट्रकला धडक दिली. या अपघातात दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला असून, कारचालक मित्र गंभीर जखमी झाला आहे. हा अपघात सकाळी ५:३० वाजण्याच्या सुमारास घडला. या दुर्दैवी घटनेत भौमिक अमोल लारोकर (वय १६, रा. संचेती कॉलेज परिसर, वर्धा रोड) आणि सागर संजय मेलवाणी (वय १७, रा. पारडी) यांचा मृत्यू झाला. तर कार चालवणारा मिहीर आनंद बेहार (वय १७, रा. प्लॉट नंबर ३६८, सुभान नगर) गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर तारांगण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिहीर बेहार याने आपल्या वडिलांची टाटा कर्व्ह इलेक्ट्रिक कार (एमएच ४९, सीएस ०४२७) घेतली होती. तो भौमिक आणि सागर या मित्रांना सोबत घेऊन त्यांचा तिसरा मित्र जय याचा वाढदिवस साजरा करण्यासाठी निघाला होता. जयला भेटायला जाण्यापूर्वी थोडा वेळ असल्याने हे तिघेही कारने फिरत होते. मिहीर कार चालवत होता, तर एक मित्र समोरच्या सीटवर आणि दुसरा मागे बसला होता. भरतवाडा वाय-पॉईंटजवळ रस्त्यावर उभ्या असलेल्या एका ट्रकवर (सीजी ०४, एमसी २९८१) कारने मागून वेगाने धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. अपघाताचा मोठा आवाज ऐकून स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कळमना पोलिसांना माहिती दिली. कारमध्ये अडकलेल्या मुलांना बाहेर काढण्यात आले, परंतु भौमिक आणि सागर यांचा जागीच मृत्यू झाला होता.
Source link
दोन अल्पवयीन मित्रांचा मृत्यू, एक गंभीर जखमी:कळमना परिसरात उभ्या ट्रकला कारची धडक