धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील खाजगी अनुदानित आश्रमशाळेत १० ऑगस्ट रोजी घडलेल्या सामूहिक सर्पदंशाच्या भीषण घटनेप्रकरणी पोलिसांनी आता कायदेशीर फास आवळला आहे. या घटनेत तीन आदिवासी विद्यार्थिनींचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. याप्रकरणी अखेर शाळेचे मुख्याध
.
मुख्याध्यापक आणि अधीक्षकाला अटक
काल (12 ऑगस्ट) मध्यरात्री धानोरा पोलीस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांचे जबाब उशिरापर्यंत नोंदवून घेतले. या चौकशीअंती प्रशासनाच्या हलगर्जीपणाबद्दल मुख्याध्यापक प्रशांत ताटपल्लीवार आणि अधीक्षक भास्कर भोयर या दोघांना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे.
पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल
आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे केलेल्या अक्षम्य दुर्लक्षामुळे एकूण पाच जणांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये खालील नावांचा समावेश आहे:
- मारोतराव कोवासे (संस्था अध्यक्ष तथा माजी खासदार)
- विश्वजीत कोवासे (संस्था सचिव तथा जिल्हा काँग्रेस कमिटीचे विद्यमान अध्यक्ष)
- प्रशांत ताटपल्लीवार (मुख्याध्यापक)
- भास्कर भोयर (अधीक्षक)
- भाग्यश्री चिल्लमवार (महिला अधीक्षिका)
आदिवासी विकास मंत्र्यांची पाहणी आणि कडक कारवाईचे संकेत
राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके यांनी जपतलाई येथील आश्रमशाळेला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना त्यांनी ५ जणांवर गुन्हे दाखल झाल्याची माहिती दिली. तसेच, या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून दोषी आढळणाऱ्या संबंधितांवर व अधिकाऱ्यांवर निलंबनाची कठोर कारवाई केली जाईल, असेही मंत्र्यांनी स्पष्ट केले.
१० ऑगस्टच्या रात्री नेमके काय घडले?
१० ऑगस्टच्या मध्यरात्री २ ते २:३० वाजेच्या सुमारास जपतलाई निवासी आश्रमशाळेत विद्यार्थिनी जेवण करून जमिनीवर झोपलेल्या होत्या. याच वेळी तिथे आलेल्या एका विषारी सापाने ६ विद्यार्थिनींना दंश केला.
मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थिनी: दीपिका लकडा (इयत्ता ६ वी), सुष्मिता मंडल (इयत्ता ८ वी), अनु कोरेटी (इयत्ता २ री)
उपचार सुरू असलेल्या विद्यार्थिनी: या घटनेत दीपिका मडावी (इयत्ता ५ वी), कविता किरंगा (इयत्ता ६ वी) आणि समृद्धी नैताम (इयत्ता ८ वी) या तीन विद्यार्थिनी जखमी झाल्या असून, त्यांच्यावर गडचिरोली जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. यापैकी समृद्धी नैताम हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली आहे.
हेही वाचा…
गडचिरोली आश्रमशाळा सर्पदंश प्रकरण: मुख्याध्यापकांसह तिघांवर गुन्हा दाखल; आश्रमशाळा कायमची बंद करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यातील जपतलाई येथील अनुदानित निवासी आश्रमशाळेत सर्पदंशाने तीन विद्यार्थिनींचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर अखेर प्रशासनाने कडक पावले उचलली आहेत. या गंभीर प्रकरणाची दखल घेत आश्रमशाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक-अधीक्षिका अशा तिघांवर धानोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच, या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आश्रमशाळेचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याचे सक्त निर्देश दिले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी