![]()
राज्यातील सत्ताधारी महायुतीमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) या मित्रपक्षांमधील अंतर्गत खदखद बीडमध्ये चव्हाट्यावर आली आहे. राज्याचे मंत्री आणि शिवसेना नेते भरत गोगावले यांच्या बीड दौऱ्यादरम्यान एका स्थानिक पदाधिकाऱ्याने थेट राष्ट्रवादीच्या आमदाराबद्दल नाराजी व्यक्त केली. दुसरीकडे, याच दौऱ्यात गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबत मोठा दावा करत, येत्या १५ ऑगस्टला आपणच रायगडमध्ये झेंडा फडकवणार असल्याचा विश्वास व्यक्त केला आहे. गेवराईत नेमकं काय घडलं? मंत्री भरत गोगावले बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. या दौऱ्यात गेवराई शहरात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वाची बैठक पार पडली. यावेळी बीडचे गेवराई विभाग जिल्हाप्रमुख चंद्रकांत नवले यांनी गोगावले यांच्यासमोर मित्रपक्षाबाबत आपली खदखद बोलून दाखवली. “गेवराईत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार विजय पंडित असल्यामुळे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना न्याय मिळत नाही,” अशी थेट तक्रार नवले यांनी केली. मात्र, असे असले तरी आपण पक्षवाढीसाठी प्रामाणिकपणे काम करत राहू आणि अखेरच्या श्वासापर्यंत शिवसेनेतच राहू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. गोगावलेंचा कार्यकर्त्यांना दिलासा नवले यांची नाराजी ऐकून घेतल्यानंतर भरत गोगावले यांनी त्यांना धीर दिला. ते म्हणाले, “आपला आमदार नसला तरी हरकत नाही. जिथे आपला आमदार नसतो, तिथे कार्यकर्त्यांना काय आणि किती अडचणी येतात, याची मला पूर्ण कल्पना आहे. याच अडचणी सोडवण्यासाठी आणि तुम्हाला बळ देण्यासाठीच मी इथे आलो आहे. आपल्याला मिळून संघटनेची ताकद वाढवायची आहे.” रायगडच्या पालकमंत्रिपदावर गोगावलेंचा दावा या दौऱ्यादरम्यान प्रसारमाध्यमांशी बोलताना भरत गोगावले यांनी रायगडच्या पालकमंत्रिपदाबाबतही सूचक वक्तव्य केले. रायगडच्या पालकमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीच्या मंत्री आदिती तटकरे आणि भरत गोगावले यांच्यात बऱ्याच काळापासून रस्सीखेच सुरू आहे. यावर बोलताना गोगावले म्हणाले, “मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात या विषयावर सविस्तर चर्चा झाली असून, लवकरच सकारात्मक निर्णय होईल. मी पावणेदोन वर्षे वाट पाहिली आहे. ‘सब्र का फल मीठा होता है’ आणि हे गोड फळ आता मलाच मिळणार आहे.” ‘…म्हणून माझा मार्ग मोकळा झाला’ आदिती तटकरे यांचे पुतणे अनिकेत तटकरे यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्यामुळे आता रायगडच्या पालकमंत्रिपदावरील आपला दावा अधिक मजबूत झाल्याचे गोगावले यांनी स्पष्ट केले. “तटकरेंच्या पुतण्याला आमदारकी मिळाल्याने माझ्या पालकमंत्रिपदाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. त्यामुळे येत्या १५ ऑगस्ट रोजी रायगडमध्ये मीच झेंडा फडकवणार,” असा ठाम विश्वास भरत गोगावले यांनी व्यक्त केला आहे. हेही वाचा.. माझा निर्णय अत्यंत शाश्वत, कोर्टात टिकून राहील:कपिल सिब्बल यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा दावा शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार अपात्रतेसंदर्भात मी दिलेला निर्णय पूर्णपणे कायदेशीर असून तो सर्वोच्च न्यायालयात नक्कीच टिकून राहील,’ असा भक्कम विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. सविस्तर वाचा
Source link
15 ऑगस्टला रायगडमध्ये झेंडा मीच फडकवणार:पालकमंत्रिपदाबाबत भरत गोगावलेंचा मोठा दावा, बीडमध्ये राष्ट्रवादीवरही साधला निशाणा