![]()
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज छत्रपती संभाजीनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या भारतीय जनता पक्षाच्या ‘तिरंगा यात्रे’वरून मोठे राजकीय वादळ निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी दाखवण्यासाठी आणि ‘उधारीचे दंड फुगवण्यासाठी’ चक्क इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना वेठीस धरले जात असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते अंबादास दानवे यांनी केला आहे. दानवे यांनी आपल्या सोशल मीडिया खात्यावर एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या यादीचा पुरावाच शेअर केल्याने भाजपच्या या शक्तिप्रदर्शनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अंबादास दानवे यांचे नेमके आरोप काय? अंबादास दानवे यांनी थेट विद्यार्थ्यांची यादी आणि त्यांचे मोबाईल नंबर असलेले पुरावे समोर आणत प्रशासनावर आणि भाजपवर जोरदार प्रहार केला आहे. दानवे यांनी संत मीरा शाळेच्या विद्यार्थ्यांची यादी शेअर करत म्हटले आहे की, “दहावीच्या पोरांना वेठीस धरणारा हा आहे ‘जगातील सर्वात मोठा पक्ष’! मुख्यमंत्र्यांसमोर उधारीचे दंड फुगवायला इयत्ता दहावीची मुले दुपारी 12 वाजल्यापासून क्रांती चौकात आणून बसवली जाणार आहेत.” मुलांच्या करिअरशी खेळ “मुलांच्या करिअरचे, परीक्षेचे काय व्हायचे ते होवो.. साहेबांसमोर गर्दीचा फुगा कसा फुगवायचा एवढाच काय तो येथील भाजपचा ‘मास्टरस्ट्रोक’ आहे,” असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे. दानवे यांनी स्पष्ट केले की, तिरंगा यात्रा हा राज्य सरकारचा नव्हे, तर भारतीय जनता पक्षाचा राजकीय कार्यक्रम आहे. स्वतःला जगातील सर्वात मोठी पार्टी समजणाऱ्या भाजपकडे पक्षाचे मोबिलायझेशन (गर्दी जमवण्याची क्षमता) नसावे का? प्रशासन आणि शिक्षकांना हाताशी धरून विद्यार्थ्यांची सक्तीने गर्दी जमवणे पूर्णपणे चुकीचे आहे. भाजपची ताकद विरुद्ध शालेय विद्यार्थ्यांची सक्ती आजच्या या तिरंगा यात्रेसाठी भाजपने मोठी तयारी केली आहे. या रॅलीला केवळ छत्रपती संभाजीनगरच नाही, तर अहिल्यानगर, खान्देश आणि संपूर्ण मराठवाड्यातून लोकांना आमंत्रित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला 5 ते 6 मंत्री आणि अनेक आमदार उपस्थित राहणार आहेत. इतकी मोठी राजकीय ताकद आणि यंत्रणा हाताशी असतानाही, दहावीसारख्या महत्त्वाच्या इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना रॅलीला उपस्थित राहण्याचे ‘टार्गेट’ शाळांना का दिले जात आहे? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. अद्याप यावर भाजपकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. सर्वोच्च न्यायालयातील लढाई आणि वाढता राजकीय संघर्ष अंबादास दानवे यांनी भाजपवर केलेला हा थेट हल्ला एका अत्यंत महत्त्वाच्या राजकीय पार्श्वभूमीवर घडत आहे. सध्या दिल्लीत सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हावरून उद्धव ठाकरे गट विरुद्ध एकनाथ शिंदे गट (आणि पर्यायाने सत्ताधारी भाजप) अशी अटीतटीची कायदेशीर लढाई सुरू आहे. कालच (गुरुवारी) सर्वोच्च न्यायालयात सलग पाचव्या दिवशी सुनावणी पार पडली. यात ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगावर आणि सत्ताधाऱ्यांवर लोकशाहीची थट्टा केल्याचा गंभीर आरोप केला. सिब्बल यांनी काल कोर्टात स्पष्ट केले की, “जर एकनाथ शिंदे गटाचे 39 आमदार अपात्र ठरले, तर निवडणूक आयोगाने ज्या विधिमंडळ बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले, तो पायाच उद्ध्वस्त होईल.” सत्तेचा आणि यंत्रणांचा गैरवापर करून बहुमताचे आकडे फुगवले जात असल्याचा युक्तिवाद ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. एकीकडे सर्वोच्च न्यायालयात ठाकरे गट विधिमंडळातील ‘फुगवलेल्या बहुमतावरून’ शिंदे-भाजप युतीला कायद्याच्या कसोटीवर खेचत आहे; तर दुसरीकडे छत्रपती संभाजीनगरमध्ये अंबादास दानवे मुख्यमंत्र्यांच्या रॅलीतील ‘फुगवलेल्या गर्दीवरून’ आणि यंत्रणांच्या गैरवापरावरून भाजपला कोंडीत पकडत आहेत. त्यामुळे कायदेशीर लढाईसोबतच रस्त्यावरील राजकीय आरोप-प्रत्यारोपांच्या फैरीही आता अधिक तीव्र झाल्याचे चित्र आहे. हेही वाचा… माझा निर्णय अत्यंत शाश्वत, कोर्टात टिकून राहील: कपिल सिब्बल यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा दावा शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार अपात्रतेसंदर्भात मी दिलेला निर्णय पूर्णपणे कायदेशीर असून तो सर्वोच्च न्यायालयात नक्कीच टिकून राहील,’ असा भक्कम विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
मुख्यमंत्र्यांसमोर गर्दी फुगवण्यासाठी 10वीच्या विद्यार्थ्यांचा वापर:भाजपच्या 'तिरंगा यात्रे'वरून अंबादास दानवेंचा जोरदार हल्लाबोल