![]()
शिवसेना पक्ष आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयात अत्यंत महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू आहे. काल (गुरुवारी) झालेल्या सुनावणीत ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी आमदारांच्या अपात्रतेच्या मुद्द्यावरून विधानसभा अध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर जोरदार निशाणा साधला होता. या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना मोठी प्रतिक्रिया दिली आहे. ‘आमदार अपात्रतेसंदर्भात मी दिलेला निर्णय पूर्णपणे कायदेशीर असून तो सर्वोच्च न्यायालयात नक्कीच टिकून राहील,’ असा भक्कम विश्वास नार्वेकर यांनी व्यक्त केला आहे. सिब्बल यांचा युक्तिवाद आणि नार्वेकरांचे प्रत्युत्तर सर्वोच्च न्यायालयात कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला होता की, “जर एकनाथ शिंदे गटाचे 39 आमदार अपात्र ठरले, तर निवडणूक आयोगाने ज्या विधिमंडळ बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला दिले, तो पायाच उद्ध्वस्त होईल.” तसेच, पक्षाने कारवाईची मागणी करूनही विधानसभा अध्यक्षांनी अपात्रतेचा निर्णय जाणीवपूर्वक प्रलंबित ठेवल्याचा आणि आमदारांना नोटिसा पाठवून वेळकाढूपणा केल्याचा आरोप सिब्बल यांनी केला होता. यावर राहुल नार्वेकर यांनी सविस्तर उत्तर दिले आहे. ते म्हणाले, “पीठासीन अधिकारी म्हणून अपात्रतेच्या याचिकांवर निर्णय घेणे ही माझी घटनात्मक आणि संवैधानिक जबाबदारी आहे. मी माझा निर्णय घेताना कायद्याच्या सर्व तरतुदींचे काटेकोरपणे पालन केले आहे. ‘डिसक्वालिफिकेशन ऑफ मेंबर ऑन ग्राउंड रुल 1986’ आणि संविधानाच्या 10व्या अनुसूचीतील जे काही नियम आहेत, त्या सर्वांचे पालन करण्यात आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या निर्देशांच्या आणि निकषांच्या चौकटीत राहूनच मी हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे माझा हा निर्णय अत्यंत शाश्वत असून तो कोर्टात निश्चितपणे टिकून राहील, याची मला पूर्ण खात्री आहे.” सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय सन्मानाने स्वीकारू सध्या हे संपूर्ण प्रकरण सर्वोच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे यावर अधिक भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे सांगत नार्वेकर म्हणाले, “मी माझे काम अत्यंत चोखपणे केले असल्याने या निर्णयात कुठेही कायदेशीर चूक मिळणार नाही, अशी मी मनापासून इच्छा व्यक्त करतो. सर्वोच्च न्यायालय हे देशातील अंतिम न्यायालय आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाचा जो काही अंतिम निर्णय असेल, तो सन्मानाने स्वीकारणे अत्यंत आवश्यक आहे.” आदित्य ठाकरेंना टोला, फिरून कुणावर उपकार करत नाही राज्यातील दौऱ्यांवरून आणि आदित्य ठाकरे यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर राहुल नार्वेकरांनी सणसणीत टोला लगावला. “नेत्यांचे कामच आहे लोकांसाठी फिरणे. आपण फिरून जनतेवर कोणतेही उपकार करत नाही. लोकप्रतिनिधी फिरत असतील, तर ते त्यांचे काम आहे आणि ते त्यांनी केलेच पाहिजे. मी देखील स्वतः माझ्या परिसरातील नागरिकांना पाणी आणि त्यांचा हक्क मिळवून देण्याच्या जबाबदारीतून फिरत आहे,” असे नार्वेकर म्हणाले. कुलाब्यातील पाणीटंचाईवरून बीएमसीवर नाराजी दक्षिण मुंबईतील कुलाबा परिसरात सध्या पाणीटंचाईची मोठी समस्या निर्माण झाली असून, राहुल नार्वेकर यांनी स्वतः तिथे जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) कारभारावर नाराजी व्यक्त केली. “कुलाबा परिसर हा ‘लो लाईन एरिया’ (सखल भाग) आहे. मलबार हिलवरून शेवटचे टोक असलेल्या कुलाबा आणि नेव्ही नगर भागात पाणी येताना नेहमीच टंचाई निर्माण होते. बीएमसीकडून येथे पुरेसा पाणीपुरवठा होत नाही. यावर उपाय म्हणून मी माझ्या आमदार निधीतून नागरिकांसाठी दोन लाख लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधून दिली आहे. मात्र, तरीही महानगरपालिकेकडून या ठिकाणी सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिकांना पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे,” अशी खंत नार्वेकर यांनी व्यक्त केली. हेही वाचा… 5 वर्षांत 36 हजार कंपन्या बंद:आता चाकणमधून 20 कंपन्यांचे स्थलांतर; उद्योगांच्या दुरवस्थेवरून शरद पवारांचा सरकारवर घणाघात पुण्यातील चाकण औद्योगिक वसाहतीतील तब्बल २० कंपन्यांनी मूलभूत सुविधांच्या अभावामुळे स्थलांतर करण्याचा निर्णय घेतल्याची बाब समोर आली आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) अध्यक्ष शरद पवार यांनी राज्य सरकारवर चिंता व्यक्त करत जोरदार निशाणा साधला आहे. “पायाभूत सुविधांच्या अभावामुळे उद्योगांचे स्थलांतर होणे किंवा ते बंद पडणे हे महाराष्ट्रासाठी निश्चितच भूषणावह नाही,” अशा शब्दांत पवारांनी राज्य सरकारला खडे बोल सुनावले आहेत. येथे वाचा संपूर्ण बातमी
Source link
माझा निर्णय अत्यंत शाश्वत, कोर्टात टिकून राहील:कपिल सिब्बल यांच्या आमदार अपात्रतेसंदर्भातील युक्तिवादानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचा मोठा दावा